खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश
‘तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावरील उन्नत मार्ग व सहापदरीकरणास राज्य शासनाची मंजुरी’
पुणे – गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तळेगाव चाकण शिक्रापूर (रा.मा.५४८ डी) या राष्ट्रीय महामार्गावरील एलिव्हेटेड रस्त्यासाठी सुरू असलेल्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून राज्य शासनाने मंजुरी दिल्याचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी आणि अपघाताचे केंद्र बनलेल्या या महामार्गाच्या विकसनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याच्या कामासाठी खासदार डॉ. कोल्हे मागील ५-६ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. खराब व अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी व अपघात पाहता या रस्त्याचे चौपदरीकरण व उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रस्ता) बांधण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी आग्रह धरल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने डिसेंबर २०२४ मध्ये या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू केली होती. मात्र त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती. निवडणुका संपल्यानंतर राज्य सरकारने हा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाकडे (MSIDC) हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने तळेगाव चाकण शिक्रापूर, पुणे शिरुर आणि हडपसर ते ऊरळीकांचन हे तीनही महामार्ग महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाला हस्तांतरित केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याचे भवितव्य अधांतरी झाले होते.
तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याचे काम रखडल्यामुळे चाकण व आसपासच्या गावांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेल्या डीपीआरनुसार महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाने हा महामार्ग बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांची भेट घेऊन केली होती. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता.
खासदार डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे अखेरीस २२ एप्रिल रोजीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर तळेगाव ते चाकण दरम्यान चौपदरी रस्ता व उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रस्ता) आणि चाकण ते शिक्रापूर दरम्यान सहापदरी रस्ता बांधण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार बीओटी तत्त्वावर हा महामार्ग बांधण्यात येणार असून राज्य शासनाने तरतूद केलेल्या अपफ्रन्ट रकमेतून चौपदरी व सहापदरी रस्त्यासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. वस्तु व सेवा कर आणि गौण खनिज वगळून या महामार्गाच्या विकसनासाठी सुमारे रु. ३९२३.८९ कोटी रकमेची तरतूद करण्यात आली आहे.
तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याच्या कामाचे शासन आदेश निर्गमित झाल्याबद्दल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी समाधान व्यक्त करीत राज्य शासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले की, या राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे हा महामार्ग तातडीने बांधावा अशी मागणी मी सातत्याने करीत होतो. या मागणीला यश आले याचे समाधान असून आता राज्य शासनाने रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करावी. तसेच एमएसआयडीसीने लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबवून हा राष्ट्रीय महामार्ग अपघात आणि वाहतूक कोंडीपासून मुक्त करावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. तसेच प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत आपला पाठपुरावा सुरुच राहणार असल्याचे सांगत खासदार डॉ. कोल्हे यांनी पुणे शिरुर आणि हडपसर ते ऊरळीकांचन या दोन्ही महामार्गांबाबतही शासनाने तातडीने आदेश निर्गमित करावेत अशी विनंती केली आहे.