पारंपारिक वाद्य कला जतन करण्यासाठी सुशिक्षित तरुण सरसावले..पारंपारिक वाद्य कलाकारांना पुन्हा सुगीचे दिवस..

WhatsApp

पारगाव : ( किशोर खुडे )

लग्न समारंभ मिरवणुका इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये पुन्हा पारंपारिक वाद्यांनाच मोठी मागणी वाढल्याने आता सुशिक्षित तरुण देखील या व्यवसायात उतरले आहेत.पारंपारिक वाद्य कलाकारांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत.
मध्यंतरीच्या काळात सात आठ वर्षांपूर्वी डीजे साऊंड सिस्टिमच्या वापरामुळे पारंपारिक वाद्यकलाही धोक्यात आली होती.याचा परिणाम ग्रामीण भागातील वाद्य कलाकारांवर मोठ्या प्रमाणावर झाला होता. त्यांच्यावर अक्षरक्षः उपासमारीची वेळ आली होती.ग्रामीण भागातील अनेक पारंपारिक कलाकारांचे ताफे हे बंद झाले होते.परंतू गेली दोन-तीन वर्षांपासून पारंपारिक वाद्य कलावंतांनाच लग्नसराई, मिरवणुका, इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठी मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहे. हलगी, सनई, डफ, ताशा, संबळ आदी पारंपारिक वाद्यांचे सूर आता पुन्हा घुमू लागले आहेत.परंतू आता पारंपारिक वाद्ये वाजवणारे कलाकार राहिलेले नाहीत.आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी, अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, घोडेगाव, वळती, शिंगवे, रांजणी, थोरांदळे या गावांमध्ये पारंपारिक वाद्य वाजविणारे कलाकार आहेत.सनई, हलगी ही अवघड वाद्ये वाजविणारे कलाकार आता केवळ बोटांवर मोजण्याइतकेच राहिले आहेत.
काठापूर (ता.आंबेगाव) येथिल वाद्य कलाकार पप्पू खुडे यांनीआजूबाजूच्या गावांमध्ये तरुण वाद्य कलाकारांना एकत्र करून संच तयार केला.या संचार सर्वजण तरुण कलाकार आहेत विशेष म्हणजे यामधील आकाश श्रीरंग खुडे हा पदवीधर असून त्याचे शिक्षण बी.कॉम पर्यंत झाले आहे.राकेश पंचरास, दीपक जाधव, सतीश पवार, विकास खुडे यांचे बारावी पर्यंत शिक्षण झाले आहे.या तरुणांचे वडील, आजोबा यांचा पारंपारिक वाद्य वाजविण्याचा व्यवसाय होता.आता हा पारंपारिक कलेचा वारसा या तरुणांनी हाती घेतला आहे.
सध्या ग्रामीण भागात यात्रा, लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू आहे.यामध्ये मिरवणुका, लग्न समारंभां मध्ये पारंपारिक वाद्य कलावंतांना मोठी मागणी असते . पाच ते सहा कलावंतांच्या संचाला दिवसाची बिदागी १५ ते १६ हजार रुपये मिळते.दोन महिन्याच्या हंगामात त्यांना वर्षभराची कमाई सहज होऊन जाते.असे पप्पू खुडे (काठापुर ) यांनी सांगितले.

जाहिरात

error: Content is protected !!