नारायणगाव (प्रतिनिधी ) शेतात केलेल्या पिकाचे पशु पक्षी यांच्यापासून संरक्षण व्हावे म्हणून शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया लढवत असतो. प्रत्येक वेळेस शेतामध्ये उपस्थित राहून पिकाच राखण करणं शेतकऱ्याला शक्य होत नाही. त्यावेळी शेतकरी मानव रुपी बुजगावणे तयार करून पिकाच्या बाजूला उभे करून ठेवतो. जेणेकरून पिकावर पशु पक्षाचा हल्ला होणार नाही. शेतामध्ये पिकवलेल्या पिकाला बाजार भाव मिळतोच याची खात्री नाही किमान उत्पादन चांगलं यावं. पशु पक्ष्यापासून त्याचे संरक्षण व्हावं यासाठी शेतकरी विशेष खबरदारी घेत असतो. आळे परिसरातील एका शेतकऱ्याने आपल्या वांग्याच्या शेतात बुजगावणे तयार करून उभे केले आहे. या बुजगावण्यामुळे पिकामध्ये पशुपक्ष्यांचा उपद्रव कमी होण्यास मदत होत आहे. दरम्यान पूर्वी सर्रास पिकांचे रक्षण करण्यासाठी बुजगावण्याचा प्रयोग केला जात होता. परंतु आधुनिक शेती करण्याचे प्रमाण वाढल्यापासून अशा उपाय योजनेचा लोप झाल्याचे पहायला मिळत आहे. परंतु काही भागात पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी शेतामध्ये बुजगावणे तयार करत असल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्याच्या शेतातील पीक अनेक पशुपक्षी फस्त करीत असतात. सध्या उन्हाळी भुईमूग सर्वत्र पाहायला मिळतो. या पिकाचे नुकसान देखील खारुताई तसेच उंदीर,कोल्हे, ससे यांच्यापासून होत असते. त्याचबरोबर बाजरीचे पीक काढण्यापूर्वी कणसात दाना भरल्यावर पक्षाचे थवेच्या थवे या पिकावर ताव मारीत असतात. यावेळी सुद्धा शेतकरी पक्षांपासून बाजरी पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून वेगवेगळे प्रयोग करत असतात. यामध्ये जुन्या ऑडिओ कॅसेटची रिळ पिकाच्या मधोमध बांधून होणाऱ्या आवाजामुळे पाखरं उडून जातात. व बाजरी पिकाचे नुकसान होण्यापासून बचाव होतो. काही शेतकरी तर बांबूला थाळा बांधून दुसऱ्या बाजूने त्या थाळ्यावर जोराचा आवाज होईल असे लाकडी पट्टी बांधून होणाऱ्या आवाजामुळे पक्षी उडून जातात. शेतकरी पिकाचे नुकसान टाळावं म्हणून यासाठी नेहमीच वेगवेगळे प्रयोग करीत असतो.