महामार्गालगत कचऱ्याचे ढीग; कचरा पेटविल्याने धुराचे लोट!नारायणगाव-कळंब सीमेवरील प्रकार; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर : प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी.

WhatsApp


नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा
पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव-कळंब गावांच्या सीमेवर रस्त्याच्या कडेला गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. या कचऱ्याला वारंवार आग लावली जात असल्याने परिसरात धुराचे मोठमोठे लोट पसरत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना धूर आणि दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने या समस्येवर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाताना तसेच कळंबकडून नारायणगावच्या दिशेने येताना नारायणगाव-कळंबच्या हद्दीवर रस्त्याच्या पूर्व बाजूला मोठ्या प्रमाणात ओला व सुका कचरा टाकला जात आहे. रस्त्याने ये-जा करणारे प्रवासी तसेच परिसरातील व्यापारी, शेतकरी आणि हॉटेल व्यावसायिकांकडून हा कचरा टाकला जात असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, सडलेली फळे, भाजीपाला आणि इतर ओल्या-सुक्या कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
कचरा पेटविल्याने परिसरात धुराचे लोट
या ठिकाणी साचलेल्या कचऱ्याला कोणीतरी आग लावत असल्याने दिवसभर परिसरात धुराचे लोट पसरलेले दिसतात. प्लास्टिक व अन्य कचरा जाळल्यामुळे निर्माण होणारा धूर नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींना याचा अधिक त्रास होण्याची शक्यता आहे. तसेच कचरा साचल्याने दुर्गंधी आणि डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
हद्दीच्या वादात कचऱ्याची समस्या दुर्लक्षित
महामार्गावरून दररोज मोठ्या संख्येने वाहनांची ये-जा सुरू असते. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनाही कचरा जाळल्यामुळे निर्माण होणाऱ्या धुराचा आणि दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. नारायणगाव आणि कळंब या दोन गावांच्या सीमेवरच हा कचरा टाकला जात असल्याने त्याची जबाबदारी नेमकी कोणत्या ग्रामपंचायतीची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी कचरा उचलणे, त्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि पुन्हा कचरा टाकला जाणार नाही यासाठी ठोस उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
या गंभीर समस्येची दखल घेऊन जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतींशी समन्वय साधून तातडीने कचरा हटवावा, कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी आणि कचरा जाळण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

जाहिरात

error: Content is protected !!