नारायणगाव :
पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथे औरंगपूर ते पारगाव रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या टोयोटा ग्लान्झा कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पंढरीनाथ किसन सुक्रे (वय ४४, रा. पारगाव तर्फे आळे) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवार (दि. ८) रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरीनाथ सुक्रे हे त्यांच्या ताब्यातील हिरो होंडा स्प्लेंडर (क्र. एमएच १४ डीएफ २७४६) या दुचाकीवरून औरंगपूर बाजूकडून पारगाव तर्फे आळेच्या दिशेने जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या टोयोटा ग्लान्झा (क्र. एमएच १२ वायडी ९७५२) या कारचालक अनिकेत दत्तात्रय फटांगडे (रा. कवठे यमाई, ता. शिरूर) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात व हयगयीने कार चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात सुक्रे यांच्या दोन्ही हातांना व पायांना दुखापत झाली, तर डोक्याच्या मागील बाजूस गंभीर मार लागला. या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी नितेश नारायण काटे (वय ४२, रा. पारगाव तर्फे आळे) यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कारचालक अनिकेत फटांगडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मंगेश लोखंडे करीत आहेत.