नारायणगाव :
नारायणगाव व परिसरातील ११ गावांच्या स्वच्छतेचा आणि घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी क्लस्टर आधारित एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला पुणे जिल्हा परिषद स्तरावर मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील गावांमधील घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याबरोबरच त्यातून इथेनॉल आणि सेंद्रिय खत निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे,अशी माहिती नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे यांनी दिली.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पासंदर्भात पुणे जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठक पार पडली. यावेळी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसह ११ गावांमधील घनकचरा संकलन, व्यवस्थापन आणि प्रक्रिया याबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस ११ गावांचे सरपंच व ग्रामसेवक, लायन्स क्लबचे अध्यक्ष अमितशेठ बेनके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊलीशेठ खंडागळे, बाबूभाऊ पाटे, ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे, ग्रामपंचायत सदस्य आरिफभाई आतार, संतोषभाऊ दांगट यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.