निमगाव सावा येथे कांद्याच्या ६३ गोणींची चोरी; शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान

WhatsApp


नारायणगाव :
जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे कांदा चोरीची घटना घडली असून, चोरट्यांनी शेतकऱ्याच्या कांदा बराखीचे कुलूप तोडून तब्बल ६३ गोणी कांदा चोरून नेला आहे. या चोरीमध्ये संबंधित शेतकऱ्याचे अंदाजे दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रविवार (दि. १) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाल्याचा संशय संबंधित शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
निमगाव सावा येथील संबंधित शेतकऱ्याने आपल्या कांद्याची साठवणूक कांदा बराखीमध्ये केली होती. कांद्याला भविष्यात चांगला बाजारभाव मिळेल, या अपेक्षेने त्यांनी कांदा साठवून ठेवला होता. कांदा बराखीला व्यवस्थित कुलूप लावण्यात आले होते. मात्र, चोरट्यांनी रात्रीच्या वेळी संधी साधून बराखीचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. त्यानंतर बराखीमध्ये साठवून ठेवलेल्या कांद्याच्या तब्बल ६३ गोणी चोरून नेल्या.
रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. कांदा बराखीचे कुलूप तोडून कांदा चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला मोठा धक्का बसला. कष्टाने पिकविलेला कांदा बाजारभाव वाढण्याच्या अपेक्षेने साठवून ठेवला होता. मात्र, चोरट्यांनी एकाच वेळी ६३ गोणी कांदा लंपास केल्याने शेतकऱ्याचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेप्रकरणी संबंधित शेतकऱ्याने नारायणगाव पोलिस ठाण्यात कांदा चोरीची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन चोरीला गेलेला कांदा आणि चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कांद्याच्या वाढत्या दरामुळे चोरीच्या घटनांची भीती
सध्या कांद्याला बाजारपेठेत चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी न काढता बराखीमध्ये साठवून ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. बाजारभावात आणखी वाढ होईल, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा साठवून ठेवला आहे. मात्र, याच साठवलेल्या कांद्यावर चोरट्यांची नजर पडत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि इतर मशागतीसाठी मोठा खर्च करावा लागतो. अनेक संकटांचा सामना करून पिकविलेला कांदा योग्य भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत बराखीमध्ये साठवला जातो. अशा परिस्थितीत कांदा चोरीला गेल्यास शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका सहन करावा लागतो. निमगाव सावा येथील घटनेमुळे परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
कांदा चाळींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पहारा
कांदा चोरीच्या संभाव्य घटना रोखण्यासाठी तसेच चोरी झाल्यास चोरट्यांची ओळख पटावी, यासाठी काही शेतकऱ्यांनी आपल्या कांदा चाळींवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. रात्रीच्या वेळी कांदा चाळींच्या परिसरात होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. कांदा साठवणुकीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.
दरम्यान, निमगाव सावा परिसरातील कांदा चोरीच्या घटनेचा पोलिसांनी गांभीर्याने तपास करावा, रात्रीची गस्त वाढवावी आणि शेतकऱ्यांच्या कांदा साठवणुकीच्या ठिकाणांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. मेहनतीने पिकविलेला कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह अन्य सुरक्षा उपायांचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

जाहिरात

error: Content is protected !!