नारायणगाव :
नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेऊन ते नागरिकांना परत करण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत सीईआयआर (CEIR) पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक तपास करून विविध कंपन्यांचे एकूण १८ मोबाईल फोन शोधून हस्तगत करण्यात आले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे ४ लाख ५० हजार रुपये असून, ते संबंधित मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नारायणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सोनकांबळे, डीबी पथकाचे इन्चार्ज पोलीस उपनिरीक्षक पाटील तसेच पोलीस हवालदार मंगेश लोखंडे, पोलीस शिपाई सोमनाथ डोके, सत्यम केळकर, टिटेश जाधव आणि आदेश दक्षिणकर यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाईलचा शोध घेतला. विविध जिल्ह्यांतून तसेच काही अन्य राज्यांतून हे मोबाईल हस्तगत करण्यात आले.
दरम्यान, यापूर्वीही नारायणगाव पोलिसांनी अशाच प्रकारची कामगिरी केली होती. त्यामध्ये १२ लाख १६ हजार रुपये किमतीचे ६३ मोबाईल शोधून ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले होते. तसेच सन २०२५ ते २०२६ या कालावधीत एकूण १६ लाख ६४ हजार रुपये किमतीचे ८७ मोबाईल विविध जिल्ह्यांतून आणि अन्य राज्यांतून शोधून हस्तगत करण्यात आले आहेत.
हरवलेले मोबाईल शोधून ते नागरिकांना परत मिळवून देण्याच्या या कामगिरीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, नारायणगाव पोलिसांच्या तांत्रिक तपासाचे कौतुक होत आहे.