शिरोलीतील दहा एकर जमिनीच्या व्यवहारात बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप; नऊ जणांविरुद्ध गुन्हा.जमीन खरेदीखत करून दीड कोटींचे गहाणखत केल्याची फिर्याद.

WhatsApp


नारायणगाव :
जुन्नर तालुक्यातील शिरोली तर्फे आळे येथील गट क्रमांक २२७ मधील दहा एकर शेतजमिनीच्या व्यवहारात बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांनी बनावट आधारकार्डाच्या आधारे जमिनीचे खरेदीखत करून त्यानंतर या जमिनीवर दीड कोटी रुपयांचे गहाणखत केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी संतोष लक्ष्मण चिंचवडे (वय ४२, रा. शिरोली तर्फे आळे, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष शिवाजीराव बढे, सौरभ संतोष बढे, सुलोचना भास्कर खरे, प्रकाश देवराम काळे, वंदना प्रकाश पाटील, राणी कुमार, पांडुरंग रखमा गुंजाळ, बाबाजी सखाराम घाडगे आणि भैरवनाथ नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक रमेश खरमाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरोली तर्फे आळे येथील गट क्रमांक २२७ मधील दहा एकर जमिनीचा १९७५ पासून आपल्या कुटुंबाकडे ताबा व वहिवाट असल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. या जमिनीच्या ताब्याबाबतची कागदपत्रेही आपल्याकडे असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या जमिनीच्या प्रतिकूल ताब्याबाबत जुन्नर येथील दिवाणी न्यायालयात २०२२ मध्ये दावा दाखल केला असून, तो अद्याप न्यायप्रविष्ट आहे.
दरम्यान, २३ मे २०२४ रोजी दैनिक संध्या या वृत्तपत्रात संबंधित जमिनीबाबत न्यायालयीन प्रकरण सुरू असल्याची जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच या जमिनीची खरेदी-विक्री अथवा अन्य व्यवहार करू नयेत, असे नोटिशीत नमूद केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
असे असतानाही संबंधित आरोपींनी मूळ मालक कृष्णाबाई भर्तार विनायक यांच्या नावाने बनावट आधारकार्ड तयार करून, सुलोचना भास्कर खरे यांना मूळ मालक म्हणून उभे करून ४ जून २०२४ रोजी गट क्रमांक २२७ मधील जमिनीचे खरेदीखत केल्याचा आरोप आहे. या खरेदीखताचा दस्त क्रमांक ३११०/२०२४ असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
त्यानंतर संतोष शिवाजीराव बढे व त्यांच्या मुलाच्या नावे भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या मंचर शाखेतून संबंधित जमिनीवर दीड कोटी रुपयांचे गहाणखत करण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या गहाणखताचा दस्त क्रमांक ३१११/२०२४ असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
जमिनीच्या ताबा व वहिवाटीसंदर्भात यापूर्वी न्यायालयीन तसेच महसूल स्तरावर निर्णय झाल्याचा दावाही फिर्यादीने केला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदीखत व गहाणखत करून फसवणूक केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्यात ६ ऑक्टोबर २०२६ रोजी भारतीय दंड संहिता कलम ४१७, ४१९, ४२०, ४६५, ४६६, ४६८, ४७१ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास नारायणगाव पोलिस करीत आहेत.

जाहिरात

error: Content is protected !!