.
नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भाताचे मुख्य पीक धोक्यात आले आहे. भात शेतीसाठी महत्त्वाची असलेली पाण्याची खाचरे आटल्याने भाताची रोपे पिवळी पडू लागली असून, काही ठिकाणी लोंब्याही न आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. दसऱ्यापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर भात पीक पूर्णपणे वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील घाटघर, आजनावळे, खडकुंबे, तांबे, हडसर, फांगुळ गव्हाण, हिरडी, निमगिरी, चावंड, पूर, भिवाडे, केवाडी तसेच कोपरे, मांडवे, पुताचीवाडी, जोशीचीवाडी आदी भागात भात हे प्रमुख पीक घेतले जाते. या भागातील बहुतांश शेतकऱ्यांचे आर्थिक गणित भात पिकावर अवलंबून असते. त्यामुळे भात पिकाचे नुकसान झाल्यास त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे.
यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला जुन्नर तालुक्यात जून आणि जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे भात लागवडीसाठी आवश्यक असलेली परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर पावसाने अचानक उघडीप दिल्याने पश्चिम भागातील पाण्याचे स्रोत कमी होऊ लागले आहेत. भात पिकाला वाढीच्या काळात सातत्याने पाण्याची आवश्यकता असते. मात्र, पावसाअभावी अनेक ठिकाणी खाचरे कोरडी पडू लागली आहेत.
सध्या भात पीक वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात आहे. मात्र, पाण्याअभावी भाताची रोपे पिवळी पडत असून काही ठिकाणी पिकाची वाढ खुंटली आहे. काही भागात भाताला लोंब्याही आलेल्या नाहीत. त्यामुळे पाऊस आणखी लांबल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. दसऱ्यापर्यंत पाऊस झाल्यास काही प्रमाणात भात पिकाला दिलासा मिळू शकतो; अन्यथा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यंदा राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जुन्नर तालुक्यात जून-जुलै महिन्यात झालेल्या पावसाच्या नोंदीच्या आधारे तालुका दुष्काळाच्या निकषातून वगळण्यात आला आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत प्रत्यक्ष शेतपिकांची पाहणी केल्यास पश्चिम आदिवासी भागातील भात पिकाची स्थिती गंभीर होत चालली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सरसकट पंचनामा करून भरपाई द्यावी
पावसाअभावी भात पिकाचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने प्रशासनाला तातडीने भात पिकाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश द्यावेत. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पश्चिम जुन्नर भागातील नेते देवराम लांडे यांनी केली आहे.
भात हे आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असल्याने त्याचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे शासनाने केवळ पावसाच्या नोंदीवर आधारित निर्णय न घेता प्रत्यक्ष पिकांची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.