भोरवाडी येथे दोन दुचाकींची धडक; दोघांचा मृत्यू, एक जखमी

WhatsApp

नारायणगाव :

भोरवाडी (ता. जुन्नर) येथील दत्त मंदिराजवळ वळणावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 29) दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास भोरवाडी ते वडगाव रस्त्यावर घडला. या अपघातात गुलाब सहादू भोर (वय 55, रा. वडगाव, भोरवाडी, ता. जुन्नर) आणि ओंमकार राजू कडाळे (रा. बोरी, साळवाडी, ता. जुन्नर) यांचा मृत्यू झाला. आर्यन किरण साठे (रा. शिरोली तर्फे आळे, ता. जुन्नर) हा जखमी झाला आहे. याबाबत समीर गुलाब भोर यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाब भोर हे त्यांच्या ताब्यातील हिरो होंडा पॅशन प्रो दुचाकीवरून भोरवाडीच्या दिशेने वडगावकडे जात होते. त्यावेळी समोरून ओंमकार कडाळे हा होंडा ड्रीम युगा दुचाकी भरधाव वेगाने व हयगयीने चालवत आला. त्याने रस्त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करून गुलाब भोर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या धडकेत गुलाब भोर यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर तसेच हात, छाती व डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच ओंमकार कडाळे यालाही डोके, छाती व तोंडाला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. ओंमकारच्या दुचाकीवर मागे बसलेला आर्यन साठे जखमी झाला असून दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 228/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 106 (1), 281, 125 (अ), 125 (ब), 324 (4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस हवालदार लोखंडे (ब. नं. 2511) यांनी केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनकांबळे करीत आहेत.

जाहिरात

error: Content is protected !!