साखरेचे दर वाढू लागल्याने शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल. मागील वर्षापेक्षा दहा टक्के आडसाली ऊस लागवडीत वाढ.

WhatsApp

नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा

गेल्या काही दिवसापासून साखरेच्या बाजारभावात वाढ होऊ लागल्याने जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल पुन्हा ऊस लागवडीकडे वाढताना दिसून येत आहे. तरकारी व इतर भाजीपाला पिकांच्या बाजारभावात सातत्याने चढ-उतार होत असल्याने उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ साधताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे तुलनेने स्थिर उत्पन्न मिळण्याची शक्यता असलेल्या ऊस पिकाला शेतकरी पसंती देत आहेत. मागील वर्षापेक्षा यंदा अडचणी ऊस लागवड क्षेत्रात दहा टक्के लागवड क्षेत्र वाढले असल्याचे कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी सांगितले.

जुन्नर तालुक्यात अनेक शेतकरी भाजीपाला, कांदा, टोमॅटो यांसह विविध पिकांची लागवड करतात. मात्र, बाजारभावातील अनिश्चितता, वाढता उत्पादन खर्च, मजुरीचे दर आणि हवामानातील बदल यामुळे भाजीपाला पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नाची शाश्वती राहिलेली नाही. काही वेळा बाजारभाव कमी झाल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. याउलट साखरेच्या बाजारभावात वाढ होत असल्याने आगामी काळात ऊसाला चांगला दर मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याचा विचार करून अनेक शेतकरी ऊस लागवडीचे नियोजन करू लागले आहेत. ऊस पिकाला बाजारपेठ तसेच साखर कारखान्यांच्या माध्यमातून निश्चित खरेदीची व्यवस्था उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांचा त्याकडे ओढा वाढत आहे. तालुक्यातील काही भागांत ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांकडून मशागतीची कामे सुरू झाली असून, लागवडीसाठी बेणे उपलब्ध करून घेण्याची तयारीही सुरू आहे. साखरेच्या दरातील वाढ कायम राहिल्यास आगामी हंगामात ऊस लागवडीच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. मात्र, ऊस लागवड करताना पाण्याची उपलब्धता, जमिनीची सुपीकता आणि सिंचनाची स्थिती यांचा विचार करणे आवश्यक आहे. पाण्याची कमतरता असलेल्या भागातील शेतकऱ्यांसाठी ऊस हे जोखमीचे पीक ठरू शकते. त्यामुळे बाजारभावाबरोबरच उपलब्ध पाण्याचे नियोजन करूनच ऊस लागवडीचा निर्णय घेणे गरजेचे असल्याचे जाणकारांचे मत आहे. साखरेच्या दरवाढीमुळे ऊस लागवडीला चालना मिळत असली, तरी आगामी काळातील साखरेचे दर, कारखान्यांचा ऊस दर आणि पाण्याची उपलब्धता यावर शेतकऱ्यांच्या या निर्णयाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. दरम्यान साखरेचे दर वाढू लागल्याने ऊस लागवडीची गोडी शेतकरी वर्गाला वाढू लागल्याने साखर कारखान्याच्या गट कार्यालयाला देणे मागणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे. साखरेचे दर असेच वाढत राहिले तर उसाला अधिकचा बाजारभाव मिळू शकेल असे विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले.

जाहिरात

error: Content is protected !!