नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
कांदळी (ता. जुन्नर) येथील तुळजाभवानी संस्कृती कलाकेंद्रात कार्यक्रमाची बारी लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून पिस्तूलातून गोळीबार केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. शिवशंकर मारुती हळदेकर (वय २८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे अन्वेषण पथकाने त्याला पुणे येथून ताब्यात घेऊन नारायणगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याला जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या गुन्ह्यातील इतर तीन संशोधकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.अटक आरोपी शिवशंकर हळदेकर कुविख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी केबल चोरी प्रकरणी जुन्नर, सुपा व इतर पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. घटना शनिवारी (दि. ८) पहाटे साडेचार ते पावणेपाचच्या सुमारास कांदळी येथील तुळजाभवानी संस्कृती कलाकेंद्रात घडली होती.. या गोळीबारात फिरोज कादीर शेख (वय ३१, रा. ओतूर, भोईगल्ली, ता. जुन्नर) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
याबाबत कलाकेंद्राचे व्यवस्थापक अक्षय अनिल धोंगडे (वय ३८, रा. वारुळवाडी, ता. जुन्नर) यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून कोळेकर, आण्णा, चिनू व त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यक्रमाची तिसरी बारी न लावल्याच्या कारणावरून संबंधित आरोपींचा बारी मालकीण, व्यवस्थापक अक्षय धोंगडे व कलाकेंद्रातील कामगारांशी वाद झाला. या वेळी आरोपींनी शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की व मारहाण केली. वाद वाढल्यानंतर चौघांपैकी एका व्यक्तीने पिस्तूल काढून अक्षय धोंगडे यांच्यावर रोखले. ‘मारू का?’ अशी धमकी देत त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली.
धोंगडे यांनी प्रसंगावधान राखून बाजूला सरकल्याने गोळी त्यांना लागली नाही. मात्र, त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या फिरोज शेख यांना गोळी लागून ते जखमी झाले. त्यांना तातडीने आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना सोडण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणातील एका आरोपीला गुन्हे अन्वेषण पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले. त्याला नारायणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी त्याला जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कांदळी परिसरातील कलाकेंद्रावर पहिल्यांदाच गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून, गोळीबारासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल व इतर बाबींचा तपास पोलीस करीत आहेत.