’
नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवावा, या मागणीसाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून शनिवारी (दि. 9) सकाळी नारायणगाव येथील पुणे–नाशिक महामार्गावरील बसस्थानक चौकात सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘पुणे–नाशिक रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवावा’, ‘रेल्वे आमच्या हक्काची’ तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी नारायणगाव परिसर दुमदुमून गेला. आंदोलनामुळे पुणे–नाशिक महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. केंद्राच्या निर्णयाविरोधात संताप पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या मूळ मार्गात बदल करण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न राजकीय हेतूने होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. रेल्वे मार्गासाठी यापूर्वी सर्व्हे करण्यात आला असून भूसंपादनाची प्रक्रिया झाली आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्यानंतर आता जीएमआरटी दुर्बीण प्रकल्पाचा तांत्रिक मुद्दा पुढे करून मूळ मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याने जुन्नर तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. ‘पुणे–नाशिक रेल्वेचा मूळ मार्ग बदलण्याची भूमिका केंद्र शासनाने बदलली नाही, तर यापुढे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. जुन्नर तालुक्यात कोणत्याही मंत्र्यांना अथवा शासकीय अधिकाऱ्यांना फिरकू दिले जाणार नाही,’ असा इशारा आंदोलनातील सर्वपक्षीय नेत्यांनी दिला. ‘राजकीय जोडे बाजूला ठेवून रेल्वेसाठी एकत्र’ माजी आमदार अतुल बेनके म्हणाले, ‘जुन्नर तालुक्याच्या औद्योगिक, पर्यटन, कृषी आणि ग्रामीण विकासासाठी या भागातून रेल्वे जाणे अत्यंत आवश्यक आहे. हायस्पीड रेल्वे मार्गाचा सर्व्हे झाला आहे. भूसंपादनाची प्रक्रियाही झाली असून त्यासाठी सुमारे 318 कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यानंतर जीएमआरटी दुर्बीण प्रकल्पाचा तांत्रिक मुद्दा उपस्थित करून रेल्वेच्या मूळ मार्गात बदल करण्यात आला. यामागे राजकारण आहे.’ आमदार शरद सोनवणे म्हणाले, ‘शिवजन्मभूमीतून होत असलेल्या या आंदोलनाची केंद्र शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. रेल्वे मार्गाच्या प्रश्नावर यापुढे तीव्र आंदोलन छेडले जाईल. राजकीय जोडे बाजूला ठेवून जुन्नरच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत.’ ‘शिवजन्मभूमीचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवा’ विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनीही रेल्वे मार्गाचा जुन्नर तालुक्याच्या विकासाशी असलेला संबंध अधोरेखित केला. रेल्वेचा मार्ग बदलल्यास तालुक्याच्या भविष्यातील औद्योगिक आणि पर्यटन विकासाला मोठा फटका बसू शकतो, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली. बाजार समितीचे सभापती संजय काळे, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष संतोष खैरे, मनसेचे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, नगराध्यक्ष सुजाता काजळे यांच्यासह उपस्थित नेत्यांनीही रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवण्याची मागणी केली. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा मोबाईलद्वारे पाठिंबा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मोबाईलद्वारे आंदोलकांशी संपर्क साधून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी पुणे–नाशिक रेल्वे महत्त्वाची असून, मूळ मार्ग कायम ठेवण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती आंदोलनात आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, बाजार समितीचे सभापती संजय काळे, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष संतोष खैरे, मनसेचे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, नगराध्यक्ष सुजाता काजळे, भास्कर गाडगे, राजश्री बोरकर, विकास दरेकर, सुजित खैरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटे, बाबू पाटे,माऊली खंडागळे, डॉ. अनुष्का शिंदे, सुरज वाजगे, आशिष माळवदकर, संतोष वाजगे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाचे प्रास्ताविक व नियोजन शरद दरेकर यांनी केले. सूत्रसंचालन अजित वाजगे यांनी केले. आंदोलनानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन सादर केल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नारायणगाव बसस्थानक चौक आणि पुणे–नाशिक महामार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन केले होते. ‘रेल्वे मार्गासाठी पक्षभेद विसरून एकत्र’ पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग हा केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून जुन्नर तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा प्रश्न आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेते एकत्र आले असून, मूळ मार्ग कायम होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.