नाणेघाटातील ‘नानाचा अंगठा’ परिसरात तरुणाचा दरीत पडून मृत्यूधुक्यामुळे शोधमोहीमेत अडथळे; 21 तासांनंतर मृतदेह सापडला

जुन्नर तालुक्यातील नाणेघाट परिसरातील प्रसिद्ध ‘नानाचा अंगठा’ पर्वतावर पर्यटनासाठी गेलेल्या आंबेगाव तालुक्यातील एका तरुणाचा पाय घसरून खोल दरीत पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दाट धुके, पाऊस आणि वाऱ्यामुळे शोधमोहीमेत अनेक अडचणी निर्माण झाल्या. अखेर सुमारे 21 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बचाव पथकाला युवकाचा मृतदेह घोणे घाट परिसरातून शोधून काढण्यात यश आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि. 20) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दत्ता विनायक लोंढे (वय 22, रा. पारगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) हा आपल्या तीन मित्रांसह नाणेघाट येथील नानाचा अंगठा परिसरात फिरण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत तेजस लक्ष्मण काटे (वय 25), सुनील बाबुराव पवार (वय 23) आणि अनिकेत संदीप ढोबळे (वय 22) हेही होते.

फिरत असताना दत्ता लोंढे हा अर्ध्या वाटेतून परत जातो असे सांगून निघाला. मात्र इतर मित्र खाली आल्यानंतर तो पार्किंग परिसरात किंवा वाहनाजवळ आढळून आला नाही. त्यामुळे मित्रांनी स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोध सुरू केला. बराच वेळ शोध घेऊनही तो न सापडल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत चौधरी यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभाग, वन विभाग आणि रेस्क्यू टीमलाही पाचारण करण्यात आले. मात्र परिसरात दाट धुके असल्याने दरीत काहीच दिसत नसल्यामुळे शोधकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला.

शोधादरम्यान डोंगराच्या अर्ध्या भागात दत्ता लोंढे याची एक चप्पल आढळून आली. तसेच दरीकडे घसरल्याच्या खुणाही दिसून आल्याने तो पावसामुळे पाय घसरून दरीत कोसळल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चव्हाण, आपदा मित्र सुशांत भुजबळ तसेच रेस्क्यू टीमचे आदित्य डेरे आणि शंतनू डेरे यांनी थर्मल ड्रोनच्या साहाय्याने परिसराची पाहणी केली. मात्र प्रतिकूल हवामानामुळे शोधमोहीम अधिक कठीण झाली.

मंगळवारी (दि. 21) सकाळी सात वाजता पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. मुरबाड येथील दीपक विशे यांच्या सह्यगिरी रेस्क्यू टीममधील कुसुम विशे, संदेश गपाट, हेमंत ठोंबरे, रामदास ठोंबरे, मारुती वाघ, हरि लोबी आणि समीर ठोंबरे यांनी सुमारे साडेतीन तास अथक प्रयत्न करून सकाळी साडेनऊच्या सुमारास घोणे घाट परिसरातून दत्ता लोंढे याचा मृतदेह शोधून काढला.

प्राथमिक माहितीनुसार, पावसाळी वातावरणात पाय घसरून दरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने पर्यटकांना पावसाळ्यात दुर्गम पर्यटनस्थळांवर जाताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे आणि अतिउत्साह टाळावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

जाहिरात

error: Content is protected !!