नारायणगाव :
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व नारायणगाव पोलिस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या केबल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी दिली या कारवाईत तब्बल ८ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १२ केबल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
जुन्नर व आंबेगाव तालुक्यात कृषीपंपांच्या केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने विशेष तपास मोहीम हाती घेतली होती.
तपासादरम्यान केबल चोरी करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मध्य प्रदेश व नाशिक परिसरातील पाच आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील विविध ठिकाणी केबल चोरी केल्याची कबुली दिली.
या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ८.१२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच नारायणगाव, आळेफाटा, ओतूर, जुन्नर आणि पारगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण १२ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभमकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार तसेच नारायणगाव पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.
पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती हवलदार दीपक साबळे यांनी दिली. दरम्यान या गुन्ह्याचा पुढील तपास तपास नारायणगाव पोलिस स्टेशनकडून सुरू आहे.