खेडच्या शेतकऱ्यांना मिळाली १ कोटी १४ लाखांची नुकसान भरपाई.आमदार बाबाजी काळे यांची माहिती.

नारायणगाव विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा

भारतीय कृषी पीकविमा कंपनीकडे खेड तालुक्यातील २३१० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता, पीकविमा धारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सातत्याने पाठपुरावा केल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली असल्याची माहिती आमदार बाबाजी काळे यांनी दिली.

मे २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये सातत्याने पाऊस पडत असल्याने खेड तालुका कृषी विभागाने सरासरी पिकांची पाहणी केली त्याचबरोबर ‘कापणी प्रयोग’ घेऊन पिकांच्या उत्पादनात घट झाल्याचे प्रामुख्याने लक्षात आल्यानंतर शासनाकडे आवाहल पाठवण्यात आला होता. या संबंधि आमदार बाबाजी काळे यांनी शासन दरबारी सातत्याने याचा पाठपुरावा केल्यानंतर आता पीकविमा भरलेल्या २३१० शेतकाऱ्यांपैकी २ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान सोयाबीन, भात, भुईमूग, बाजरी यांसारख्या अनेक पिकांचा शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला होता. गेल्यावर्षी सातत्याने अवेळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये भुईमूग आणि सोयाबीन या पिकांचे जास्त नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. कृषी विभागाने यामध्ये २०० ते २५० पिकांचे प्रयोग घेतले होते. याबाबत कृषी विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्याआधारे आमदार बाबाजी काळे यांनी शासन स्तरावर उचित पाठपुरावा केला. नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाच्या शेतकऱ्यांना १ कोटी १३ लाख २८ हजार रुपये तर भुईमूग पिकाच्या शेतकऱ्यांना १ लाख १८ हजार ७४९ रुपये असे एकूण १ कोटी १४ लाख ४६ हजार रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होत आहे. यामध्ये २ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत असल्याचे आमदार काळे यांनी सांगितले.

“हवामानाच्या बदलामुळे त्याचबरोबर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे सातत्याने नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिकविमा उतरवला होता, परंतु यासंबंधी पाठपुरावा करणे आवश्यक असल्याने सातत्याने शासनाकडे मी पाठपुरावा केल्यामुळे अखेर शेतकऱ्यांना थेट लाभ मिळाल्याने मनस्वी आनंद आहे.” —– बाबाजी काळे (आमदार – खेड, आळंदी विधानसभा)

यावर्षी अल निनो पार्श्वभूमीवर भात व सोयाबीन पिकामध्ये उत्पन्नात घट येऊ शकते त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पिक विमा उतरून घ्यावा. —- वैभव विश्वे (खेड तालुका कृषी अधिकारी)

जाहिरात

error: Content is protected !!