नारायणगाव, विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात असून साठवणुकीअभावी कांदा बऱाखीतच सडत असल्याचे चित्र आहे. स्थानिक शेतकरी सुनील विठ्ठल भुजबळ यांचा सुमारे दीडशे पिशव्या कांदा खराब झाल्याची घटना समोर आली आहे. कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी कांदा विक्रीऐवजी साठवणूक करण्याचा पर्याय निवडत आहेत. मात्र, अपुऱ्या आणि निकृष्ट साठवण व्यवस्थेमुळे कांदा बऱाखीतच सडू लागला आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. “कांद्याला भाव नाही, मजुरी परवडत नाही आणि साठवणुकीतही नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचे कसे?” असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांना योग्य हमीभाव देण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच, शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कांदा साठवणुकीसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, बाजारभाव स्थिर ठेवण्यासाठी उपाययोजना करणे आणि हमीभाव जाहीर करणे या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नारायणगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.