नारायणगाव: विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे उष्माघातामुळे एका शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. रुपाली भाऊ गाडगे (वय 40) असे मृत महिलेचे नाव असून, तालुक्यातील उष्माघातामुळे झालेली ही पहिलीच मृत्यूची घटना असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली गाडगे या मागील दोन दिवसांपासून कडक उन्हात शेतात खुरपणीचे काम करत होत्या. सोमवारी सकाळी सुमारे साडेअकराच्या सुमारास त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने निमगाव सावा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष रास्ते यांनी त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू केले. तपासणीदरम्यान त्यांचा रक्तदाब अत्यंत कमी झाल्याचे आढळून आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र अधिक तपासण्यांची गरज असल्याने त्यांना पुढील तपासणीसाठी डायग्नोस्टिक केंद्रात जाण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, तपासणीसाठी जात असताना वाहनात बसताना त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे निमगाव सावा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रुपाली गाडगे यांच्या पश्चात पती व तीन मुले असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावकऱ्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. तसेच वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात काम टाळावे, अशीही सूचना वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. दरम्यान याबाबत जुन्नरचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांना विचारणा केली असता ते म्हणाले की सदर महिला शेतामध्ये काम करत असताना चक्कर येऊन पडली. मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदनानंतर स्पष्ठ होईल. @ सोबत मृत झालेल्या महिलेचा फोटो