विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा : नारायणगाव (ता. जुन्नर) – पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नारायणगाव येथील ऐतिहासिक तमाशा पंढरीत यंदा मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याचे चित्र दिसून आले आहे. अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीत सुमारे नऊ ते दहा कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज फडमालकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदाचा तमाशा हंगाम अत्यंत उत्साहवर्धक ठरत असून कलाकार आणि फडमालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या स्वर्गीय विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या नावाने ओळखली जाणारी ही तमाशा पंढरी यंदाही गजबजलेली आहे. येथे सुमारे ३० ते ३२ फडमालकांचे तंबू (राहुट्या) उभारण्यात आले आहेत. यामध्ये चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता महाडिक पुणेकर, मालती इनामदार, सुरेखा पुणेकर, तुकाराम खेडकर, काळू बाळू, मंगला बनसोडे आदी नामांकित फडमालकांचा समावेश आहे. फडमालकांच्या मते, यंदा बहुतेक सर्व तारखा आधीच बुक झाल्या असून मागणी प्रचंड वाढली आहे. दरवर्षी पाडव्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात बुकिंग होत असते; मात्र यंदा त्याआधीच बहुतांश कार्यक्रम निश्चित झाले होते. त्यामुळे तमाशा व्यवसायाला यंदा चांगले दिवस आले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती परिसरात काही प्रमाणात तमाशा बारीवर परिणाम झाल्याचे काही फडमालकांनी नमूद केले. तरीही इतर भागांमध्ये प्रेक्षकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असल्याने एकूण हंगामावर त्याचा विशेष परिणाम झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. फडमालक मोहित नारायणगावकर आणि किरणकुमार ढवळपुरीकर यांनी सांगितले की, “यंदाचा तमाशा हंगाम अत्यंत चांगला चालला आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत असून आर्थिकदृष्ट्याही समाधानकारक परिस्थिती आहे.” तर काहींनी गौतमी पाटील यांसारख्या नृत्यांगनांच्या कार्यक्रमांमुळे पारंपरिक तमाशावर परिणाम होतो का, यावर भाष्य करताना स्पष्ट केले की, “अशा कार्यक्रमांचा आमच्या तमाशावर कोणताही नकारात्मक परिणाम झालेला नाही. पारंपरिक तमाशाला आजही तितकीच मागणी आहे,” असे भिका भीमा यांच्या फडमालकांनी सांगितले. तमाशा मधून समाज प्रबोधनाचे काम अधिक प्रमाणात केले जात असल्याचे पण मालकांनी सांगितले. पाडव्याच्या दिवशी नारायणगावच्या तमाशा पंढरी मध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून तमाशा शौकीन तमाशाची बारी ठरवायला आले होते. गावच्या यात्रेची तारीख व फळ मालकाकडे शिल्लक असलेली तारीख याचा ताळमेळ बसताना दिसत नव्हता कारण बहुतांशी फळ मालकांच्या तारखा ह्या अगोदरच बुक झाल्याचे पाहायला मिळाले किरकोळ चार दोन फळ मालक वगळता बहुतांशी फड मालकांच्या सगळ्या तारखा ” हाउसफुल” झाल्याचे स्वर्गीय चंद्रकांत ढवळपुरीकर या फडाचे मालक किरण कुमार ढवळपुरीकर यांनी सांगितले. ते म्हणाले की एक महिन्यापूर्वी नारायणगाव या ठिकाणी फड मालकांच्या राहूट्या लागले आहेत. पाडव्याला तमाशाची बारी ठरवायला मोठी गर्दी दरवर्षी होत असते परंतु यंदा त्याच्या अगोदरच बहुतांशी तारखा बुक झाल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच नारायणगावची तमाशा पंढरी यंदा पुन्हा एकदा तेजीत असून पारंपरिक लोककलेचा हा वारसा अधिक बळकट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. फडमालकांच्या म्हणण्यानुसार, पूर्वीचा तमाशा आणि आताचा तमाशा यामध्ये लक्षणीय बदल झाला आहे. पारंपरिक गण, गवळण आणि बतावणी हे तमाशाचे आत्मा मानले जाणारे भाग आजही सादर केले जात असले तरी त्यांच्या सादरीकरणाचा वेळ कमी झाल्याचे चित्र आहे. पूर्वी तमाशा बारी रात्री उशिरापर्यंत रंगत असे; मात्र आता प्रशासनाच्या नियमांमुळे आणि बदलत्या प्रेक्षकांच्या आवडीनिवडीमुळे तमाशाचा कालावधी मर्यादित करण्यात आला आहे. परिणामी, कमी वेळेमध्ये गण, गौळण,बतावणी, गाणी आणि वग हे सर्व कार्यक्रम फडमालकांना एकत्रितपणे सादर करण्यास पोलीस प्रशासनाकडून बारा वाजेपर्यंत ची वेळ आहे त्यामुळे कमी वेळात हे सगळं सादर करत असताना फळमालकांची मोठी कसरत लागत असते. उडत्या चालींच्या गाण्यांना अधिक मागणी फडमालकांनी सांगितले की, सध्या प्रेक्षकांची आवड झपाट्याने बदलत आहे. पारंपरिक वग (नाट्यप्रधान भाग) किंवा दीर्घ कथानकांपेक्षा उडत्या चालीची, जलद गतीची गाणी आणि नृत्यप्रकारांना अधिक मागणी आहे. त्यामुळे कार्यक्रमाची रचना देखील त्यानुसार बदलावी लागत आहे. “पूर्वी वगाला खूप महत्त्व असायचे; मात्र आता त्याला फारशी मागणी उरलेली नाही. प्रेक्षकांना जलद आणि मनोरंजक सादरीकरण हवे असते,” असे काही फडमालकांनी स्पष्ट केले. हंगाम तेजीत; तारखा आधीच फुल यंदा बहुतेक फडमालकांच्या सर्व तारखा आधीच बुक झाल्या असून तमाशा हंगाम तेजीत असल्याचे दिसून येत आहे. “पाडव्याच्या आधीच आमच्या सर्व तारखा निश्चित झाल्या. यंदा प्रतिसाद खूप चांगला आहे,” असे मोहित नारायणगावकर व किरणकुमार ढवळपुरीकर यांनी सांगितले. काही भागात परिणाम, तरी एकूण चित्र सकारात्मक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती परिसरात काही प्रमाणात तमाशा बारीवर परिणाम झाल्याचे फडमालकांनी सांगितले. मात्र इतर भागात प्रेक्षकांचा ओघ कायम असल्याने एकूण हंगामावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. आधुनिक कार्यक्रमांचा परिणाम नाही गौतमी पाटील यांसारख्या कलाकारांच्या कार्यक्रमांमुळे पारंपरिक तमाशावर परिणाम होतो का, याबाबत विचारले असता, “असा कोणताही परिणाम होत नाही. तमाशाची स्वतःची एक वेगळी ओळख आणि प्रेक्षकवर्ग आहे,” असे भिका भीमा यांच्या फडमालकांनी सांगितले. एकूणच, बदलत्या काळानुसार तमाशा आपल्या स्वरूपात बदल करत असला तरी त्याचे आकर्षण कायम आहे. नारायणगावची तमाशा पंढरी यंदा पुन्हा एकदा गजबजून पारंपरिक लोककलेचा वारसा जपत आधुनिकतेशी जुळवून घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.