नारायणगाव : राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी पान टपऱ्यांवर सर्रासपणे गुटखा विक्री होत असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील गावोगावी असलेल्या छोट्या पान टपऱ्या, किराणा दुकाने आणि काही चहाच्या टपऱ्यांवरही खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातही गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तरुणांमध्ये आणि अल्पवयीन मुलांमध्येही गुटखा सेवनाचे प्रमाण वाढत असल्याची चिंता पालक व्यक्त करत आहेत. शासनाने गुटख्यावर बंदी घातली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. स्थानिक प्रशासन, अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करून गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. यासोबतच नियमित तपासण्या करून गुटखा विक्री रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. प्रतिक्रिया : संतोष गावडे (स्थानिक नागरिक) : “गुटखा बंदी असूनही गावातील अनेक टपऱ्यांवर तो सहज मिळतो. विशेष म्हणजे शाळेजवळही विक्री होत आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी.” शरद नेहरकर (पालक) : “लहान मुलांमध्ये गुटखा सेवनाचे प्रमाण वाढताना दिसते. दुकानदारांवर कडक कारवाई झाली तरच ही विक्री थांबेल.” संजय भुजबळ (सामाजिक कार्यकर्ते) : “गुटखा हा आरोग्यास अत्यंत घातक आहे. प्रशासनाने अचानक धाडी टाकून गुटखा विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे.” दरम्यान, जुन्नर तालुक्यात गुटखा विक्री रोखण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.