युद्धसदृश परिस्थितीचे पडसाद; जुन्नर तालुक्यात हॉटेल व्यवसाय व मंगल कार्यालयांची चिंता वाढली. टाक्यांचा तुटवडा पडल्यास मंगल कार्यालय मालकांना चुलांगण पेटवावे लागणार.

WhatsApp


नारायणगाव : मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीमुळे इंधन दरवाढीची शक्यता निर्माण झाली असून त्याचे पडसाद आता स्थानिक पातळीवरही उमटू लागले आहेत. गॅस सिलेंडरच्या दरवाढीची शक्यता तसेच पुरवठ्यातील अनिश्चितता यामुळे जुन्नर तालुक्यातील हॉटेल व्यवसायिक व मंगल कार्यालय मालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे बुकिंग झालेली लग्न पूर्ण करण्यासाठी चुलांगण पेटवून स्वयंपाक करायला मालकांना करावा लागणार आहे. तालुक्यातील बहुतांश हॉटेल व्यवसाय एलपीजी गॅसवर अवलंबून असल्याने गॅसच्या दरात वाढ झाल्यास व्यवसाय चालवणे कठीण होईल, असे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे खाद्यपदार्थांच्या कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. त्यात गॅस दरवाढ झाली तर हॉटेलचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हॉटेल मालक सचिन खैरे यांनी सांगितले की, “हॉटेल व्यवसाय पूर्णपणे गॅसवर चालतो. गॅसच्या दरात वाढ झाली किंवा सिलेंडर वेळेवर मिळाले नाहीत तर आमचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढेल. अशा परिस्थितीत ग्राहकांना स्वस्त दरात सेवा देणे कठीण होईल.” दरम्यान, सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने तालुक्यातील मंगल कार्यालयांमध्ये कार्यक्रमांची लगबग आहे. मात्र स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणावर गॅस लागतो. सध्या गॅस टाक्यांचा पुरवठा अत्यल्प होत असल्यामुळे मंगल कार्यालय मालकांना हातात चुलांगण पेटवून झालेल्या लग्नाच्या वराडाला जीवन द्यावे लागणार आहे. तसेच दरवाढ किंवा पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यास कार्यक्रमांच्या खर्चात वाढ होणार असल्याचे अंजली मंगल कार्यालय मालक परशुराम शेटे यांनी सांगितले की, 14 ते 16 मार्च लग्न तिथी जास्त आहेत. गॅसच्या टाक्या पुरवठा होत नाही त्यामुळे आम्हाला आता चुलांगण पेटवून त्यावर स्वयंपाक करावा लागणार आहे. गॅसचा पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर पुढच्या लग्नाच्या तारखा बुक करता येणार नाही. नारायणगाव येथील निलयम मंगल कार्यालयाचे मालक संजय वारुळे म्हणाले की “लग्नसमारंभासाठी जेवणाची मोठी व्यवस्था करावी लागते. गॅसचे दर वाढले तर थेट कार्यक्रमांच्या खर्चावर परिणाम होतो. त्यामुळे आयोजक आणि मंगल कार्यालय चालक दोघांनाही अडचणी निर्माण होऊ शकतात.” सध्या व्यावसायिक टाक्यांचा पुरवठा देखील सुरळीत होत नसल्याने लग्न व वाढदिवस कार्यक्रमावर परिणाम होऊ लागले आहे. एकूणच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम स्थानिक व्यवसायांवरही जाणवू लागला असून गॅसचा नियमित पुरवठा व दर स्थिर ठेवावेत, अशी मागणी तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक व मंगल कार्यालय मालकांकडून केली जात आहे.

जाहिरात

error: Content is protected !!