‘विघ्नहर’ चे ४० व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्नी प्रदीपन संपन्न.
नारायणगाव : (प्रतिनिधी) जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ४० व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्नि प्रदीपन संचालक सुरेश गडगे व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता गडगे या उभयतांच्या हस्ते आज सोमवारी (दि. २२) विधिवत पूजा करून साध्या पध्दतीने पार पडला. दरम्यान यंदाचा गळीत हंगाम चालू करण्यासाठी सर्व मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून कारखाना गाळपासाठी सज्ज झाला आहे. असे सत्यशिल शेरकर यांनी सांगितले. ऊस गाळप आढावा व हंगाम नियोजनाबाबत राज्य मंत्री समितीच्या बैठकीत २०२५-२६ चा गळीत हंगाम सुरु करण्याची तारीख जाहीर झाल्यावर विघ्नहर कारखानाच्या चालू गाळप हंगाम सुरु होणार असून १३ लाख मे. टनापेक्षा जास्त ऊस गाळप करण्यासाठी सर्व यंत्रणांमार्फत नियोजन करण्यात आले आहे. मागील गाळप हंगामाचे वर्ष विघ्नहर कारखान्याच्या दृष्टीने आव्हानाचे होते. शासनाच्या धोरणानुसार कारखाना उशिरा चालू झाला त्यातच कारखान्याचे आधुनिकीकरण व विस्तारीकरणाचेही काम चालू होते. आता हे काम पूर्ण झाल्याने कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ५००० मे. टनावरुन ७५०० मे.टन झाल्याने चालू गाळप हंगामात प्रतिदिन ८००० ते ८५०० मे. टन ऊसाचे गाळप होणार आहे. तसेच को-जन प्रकल्पांसहीत ६५ केएलपीडी क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्पही पूर्ण क्षमतेने चालणार आहे. ऊसाचे उत्पादन वाढविण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या ऊस विकास विभागाचे मार्गदर्शन आणि कारखान्यामार्फत देण्यात येणारी खते तसेच इतर सर्व सुविधांचा लाभ घ्यावा, त्याचे आपल्या ऊस उत्पादनात वाढ होण्यास निश्चितच मदत होईल. येत्या हंगामातही नेहेमीप्रमाणे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विघ्नहर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस गाळपास देवून सहकार्य करावे असे अवाहन श्री शेरकर यांनी यावेळी केले. बॉयलर अग्निप्रदीपण समारंभाला कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप, सुमित्राताई शेरकर, कार्यकारी संचालक भास्कर घुले तसेच सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कामगार युनियन अध्यक्ष, सेवक पतसंस्था, सांस्कृतिक मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.