ग्रामपंचायतच्या वतीने पुष्पवृष्टी, मुस्लिम बांधवांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास मानवंदना

WhatsApp

नारायणगाव : (प्रतिनिधी) इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांची १५०० वी जयंती अर्थात ईद-ए-मिलाद विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नारायणगावमध्ये असलेला हिंदू मुस्लिम एकोपा जपत मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन गणेशोत्सवामुळे ईदची मिरवणूक दोन दिवस पुढे ढकलली होती.त्यानुसार रविवार (दि.७) रोजी सुन्नी मुस्लिम जमात नारायणगाव यांच्या वतीने मोठ्या उत्साहात जुलूस काढण्यात आला.
नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मक्का मदिना प्रतिकृतीवर केलेली पुष्पवृष्टी, मुस्लिम बांधवांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास केलेले अभिवादन, सर्वधर्मीयांचे गुलाबपुष्प देऊन केलेले स्वागत, नारायणगाव पोलीस स्टेशनने अर्पण केलेली मानाची फुलचादर आणि पाणी वाटप या कार्यक्रमांनी बंधूभावाचा संदेश देत निघालेला पैगंबर साहेबांचा हा जुलूस लक्षवेधी ठरला.
सुन्नी जामे मस्जिद पासून मुफ्ती मुनाजीर हुसेन व मुस्लिम जमातचे अध्यक्ष एजाज आतार यांच्या मार्गदर्शनाखाली जुलूसची सुरुवात झाली .बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी चौक, हनुमान चौक, जुन्नर रोड ते बसस्थानक येथून भाजी बाजार मार्गे येऊन सुन्नी जामा मस्जिद मुस्लिम मोहल्ला येथे जुलुसची सांगता करण्यात आली.
जुलूसमध्ये हाफिज शहबाज रजा, हाफिज ताहीर व हाफिस जिलानी यांच्या मार्गदर्शनाखाली मदरसा अरबीया गुलशने मदिना आणि मदरसतुल मदिना गौसूल आझमच्या मुलांनी पैगंबर साहेबांच्या मानवतावादी शांती व सद्भावनेच्या घोषणा, आकर्षण वेशभूषा,पेहराव यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. युवकांनी तयार केलेली काबा (मस्जिद अल हरम) या प्रतिकृतीने जुलूसमध्ये उपस्थितांचे लक्ष वेधले.
यानिमित्ताने शिवसेना तालुकाप्रमुख व उपसरपंच बाबू पाटे, सरपंच डॉ.शुभदा वाव्हळ, माजी उपसरपंच संतोष वाजगे, संतोष पाटे, ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, संतोष दांगट, जालिंदर खैरे, बाळा वाव्हळ, संकेत क्षीरसागर, शैलेश औटी, यांसह ग्रामपंचायतच्या वतीने मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन तसेच मुस्लिम समाजाचे पदाधिकारी यांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच नारायणगाव पोलिस स्टेशनच्या वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, पोलिस उपनिरीक्षक जगदीश पाटील, सोमशेखर शेटे, दत्ता ढेंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी मुस्लिम जमात अध्यक्ष एजाज आतार, रशिद इनामदार, अली इनामदार, डॉ.लहू खैरे, ग्रामपंचायत सदस्य जुबेर आतार, विश्वस्त हाजी नूरमोहम्मद मणियार, गफुर तांबोळी, सलीम मणियार, शफिक खान, निसार आतार, युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष अशफाक पटेल, सकलेन आतार, समीर इनामदार, रज्जाक काझी, रियाज मणियार, जुबेर शेख, निसार तांबोळी, मुनीर मोमीन, हमीद शेख, इब्राहिम आतार, फारुक मोमीन, एजाज चौधरी,आजिम शेख, शेहबाज आतार यांसह सुन्नी जामे मस्जिदचे पदाधिकारी, मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुन्नी मुस्लिम जमात यांच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ५ वाजता सलाम पठणाने झाली.त्यानंतर सामुहिक कुरआन पठण व मिठाई वाटप करण्यात आले. मदरसा अरबीया गुलशने मदिना मधील ११ मुलामुलींचे कुरआन अध्ययन पूर्ण केल्याबद्दल ‘तकमिल – ए- कुरआन’ प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.यावेळी मुलांचे पालक, नातेवाईक आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती विश्वस्त मेहबूब काझी यांनी दिली.
पैगंबर जयंतीनिमित्त आठवडाभर चाललेल्या कार्यक्रमात मजलीस व दरुदखानी, महिलांसाठी इजतेमा,मिलाद पठण, मुलांचे धार्मिक कार्यक्रमाचे सादरीकरण, मिठाई, खीर व शरबत वाटप, सर्वधर्मीयांसाठी आरोग्य शिबिर व जुलूसच्या समारोपानंतर लंगर-ए-मुस्तफाचे आयोजन करण्यात आले होते.
मुस्लिम जमात नारायणगाव यांनी आयोजित केलेल्या सर्व उपक्रमांचे उपसरपंच योगेश बाबू पाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले.

जाहिरात

error: Content is protected !!