नारायणगाव : ( प्रतिनिधी) नारायणगाव शहरातील पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या तीन बंद दुकानाचे शटर उचकटून तीन चोरट्यांनी रोख रक्कम व साहित्य असा सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असल्याचे समजते. तथापि याबाबत पोलीस स्टेशनला मात्र साधा अर्ज देण्यात आला आहे. दरम्यान चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. व्यापाऱ्यांच्या तक्रार अर्जानुसार पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. ही घटना शनिवारी (दि. 9 ) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान नारायणगाव परिसरामध्ये चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस व नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. सीसीटीव्ही फुटेज वरून चोरटे 25 ते 30 वयोगटातील तरुणांनी चेहऱ्याला रुमाल बांधून चोरी केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सह्याद्री भिसे यांच्या अष्टविनायक पेंट्स, अमोल हिरे यांच्या कृषी शक्ती ॲग्रो सर्व्हिसेस या कृषी निविष्ठा विक्रीच्या दुकानाचे, तेजस वाजगे यांच्या जिनाज केक या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरी केली आहे. सह्याद्री भिसे यांच्या अष्टविनायक पेंट्स व हार्डवेअर या दुकानातील पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम, एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याची माहिती सह्याद्री भिसे यांनी दिली. अमोल हिरे यांच्या दुकानातील 15 हजार रुपयांची रोख रक्कम,तेजस वाजगे यांच्या दुकानातील सुमारे सात हजार रुपयांची रोख रक्कम असा सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. गणेश फुटवेअर या दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे. दरम्यान नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने वेळोवेळी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन चोरी टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, सुरक्षारक्षक नियमावा असे आवाहन नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे. नारायणगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत 19 गावे येतात. मागील काही दिवसांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. नारायणगाव पोलिसांच्या वतीने रात्रीचे गस्त घालण्यात येत आहे. असे असताना रहदारीच्या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गा लगत असलेल्या तीन दुकानाचे शटर उचकटून आज्ञात तीन चोरट्यांनी चोरी केली आहे. नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वारुळवाडी, येडगाव परिसरात भर दिवसा घरफोडीची घटना झाली आहे. नारायणगाव परिसरामध्ये चोऱ्यांचे सत्र वाढल्याने पोलिसांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असून ग्राम सुरक्षा पथकाला अधिक अलर्ट करणे अपेक्षित आहे.