नारायणगाव : (प्रतिनिधी) तुम्ही वारंवार बहिणीकडे चाकणला राहायला का जाता? असे म्हणत जन्मदात्या बापाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.व उपचारादरम्यान पित्याचा मृत्यु झाला. मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव ज्ञानेश्वर नाथा खंडागळे ( वय 55 वर्षे, रा. मांजरवाडी, ता. जुन्नर जिल्हा पुणे ) असून वडिलांचे मृत्यूस कारणीभूत झालेल्या मुलाचे नाव गणेश ज्ञानेश्वर खंडागळे ( वय 38 वर्षे) असून त्याला पोलीसांनी बुधवारी (दि.16)अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती देताना नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार म्हणाले की, मांजरवाडी येथे ज्ञानेश्वर नाथा खंडागळे यांच्या गणेश ज्ञानेश्वर खंडागळे या माथेफिरू मुलाने दोन दिवसांपूर्वी (दि. 16) वडिलांना तुम्ही बहिणीकडे का जाता असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करून त्यांना खाली पाडून छातीवर व पोटावर आणि डोक्यावर जोरजोरात लाथा मारून गंभीर जखमी केले. बाजूच्या एका व्यक्तीने याबाबतची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनला फोनवरून दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ज्ञानेश्वर खंडागळे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने पोलिसांनी नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व पोलीस शिपाई आनंदा चौगुले यांनी याबाबतची फिर्याद नारायणगाव पोलीस ठाण्यात दाखल केली. दरम्यान ज्ञानेश्वर नाथा खंडागळे पुणे येथे उपचारा दरम्यान त्यांचा गुरुवारी (दि. 17) मृत्यू झाला. दरम्यान वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या माथे फिरू मुलास पोलिसांनी तात्काळ अटक केली असून याबाबतचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार करीत आहेत.