जुन्नर तालुक्यात भूरट्या चोऱ्या व बंद घरं फोडून चोऱ्यांचे प्रकार वाढले.

WhatsApp

नारायणगाव : ( प्रतिनिधी )
जुन्नर तालुक्यामध्ये भुरट्या चोऱ्या पुन्हा वाढू लागल्या असून बंद असलेल्या फ्लॅटवर चोरट्यांनी मोर्चा वळवला आहे. घरामध्ये सोन्याची दागिने, मौल्यवान वस्तू  अथवा जास्तीची
रोख रक्कम घरात कोणी ठेवू नये याबाबतची खबरदारी घेण्याची गरज आहे.
  गेल्या पंधरा दिवसापासून जुन्नर तालुक्यात रेकी करून बंद घराचे दरवाजे तोडून घरातील दागिने अथवा पैसे चोरी जाण्याचे प्रकार वाढले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी येडगाव धरणाजवळील एका शेतकऱ्याचे बंद घर चोरट्यांनी दिवसाढवळ्या फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु बाजूलाच शेतात काम करत असलेले शेतकऱ्यांचा हा प्रकार लक्षात आल्याने चोरटे पळून गेले. त्याच दिवशी पिंपळवंडी येथील    एका गरीब शेतकऱ्याचे दिवसा घर चोरट्यांनी फोडले. घरातील दागिने पळवले. तसेच बोरी व पिंपरी पेंढार येथेही असाच प्रकार घडला आहे. वारूळवाडी परिसरात देखील दिवसाढवळ्या बंद फ्लॅट फोडून चोऱ्या होऊ लागल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.
दरम्यान दिवसा ढवळ्या बंद फ्लॅट अथवा बंद घरे फोडून घरातील ऐवज चोरून नेण्याचे प्रकार सध्या वाढू लागले लागल्याने प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे. तसेच प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा दल अधिक सतर्क करण्याची आवश्यकता आहे. फेरीवाले अथवा इतर व्यावसायिक गृह सोसायटी तसेच परिसरातील बंद घरांची पाहणी करून त्या ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून घरातील ऐवज चोरून नेत असल्याचे प्रकार समोर येत आहेत . प्रत्येकाने आपापल्या घरातील वस्तूंची दागिन्यांची काळजी घेणे अपेक्षित आहे. शक्यतो सोन्याचे दागिने व पैसे घरामध्ये ठेवू नयेत. तसेच सोसायटीतील वॉचमनला सतर्क करून कोणताही फेरीवाला अगर बिगर ओळखीचा माणूस आवाराच्या आत मध्ये येणार नाही याबाबतची खबरदारी घेण्यास सांगणे गरजेचे आहे. गृह सोसाट्यात ठेवला जाणारा वॉचमची माहिती नजीकच्या पोलीस ठाणे देणे गरजेचे आहे. परिसरात होणाऱ्या भुरट्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस प्रयत्नशील राहणारच परंतु प्रत्येकाने आपल्या परिसराची, घराची, मौल्यवान वस्तूची, दागिन्याची व पैशाची काळजी घेणे आवश्यक आहे. पोलीस यंत्रणा कायदा सुव्यवस्थेबरोबरच चोऱ्यांचे प्रकार रोखण्यासाठी निश्चित प्रयत्न करतीलच परंतु प्रत्येकाने स्वतःच्या मालमत्तेची स्वतः काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.  

जाहिरात

error: Content is protected !!