नारायणगाव : (प्रतिनिधी)
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद या निवडणुका जुन्नर तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. एवढेच नाही तर पूर्व भागातील व ओतूर पट्ट्यातील इच्छुक असलेले उमेदवार देखील कार्यकर्त्यांच्या मताशी सहमती दर्शवत असल्याचे समजते. पूर्व भागातील जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेल्या एका उमेदवाराने याबाबत खासदार अमोल कोल्हे यांच्याशी देखील चर्चा केली असल्याची माहिती समजते. जुन्नर तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद एकत्र केली तर जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच जुन्नर नगर परिषदेत निवडणूकित चांगले यश येऊ शकते. मागील जिल्हा परिषद पंचायत समिती व जुन्नर नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यामुळे पक्षाची ताकद विभागली गेल्याने लोकसभेची निवडणूक वगळता विधानसभा निवडणुकीला मोठा फटका बसला. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणूक जर एकत्र लढली तर याचा फायदा दोन्ही पक्षाला देखील चांगला होऊ शकतो.मात्र दोन्ही राष्ट्रवादीची जर युती झाली नाही तर याचा फायदा इतर पक्षांना जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर नेत्यांनी करावा अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे. दरम्यान नाव न छापण्याच्या अटीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणाला की, पवार साहेबांचा करिष्मा जुन्नर तालुक्यामध्ये निश्चित चांगला आहे. विधानसभेला त्याचा मतं अधिकची मिळवण्यात फायदा देखील झाला. परंतु ज्यांच्यासाठी मतं मागितली ते आता पक्षासाठी काहीच करीत नाहीत. त्यामुळे साहेबांनी जिल्हा परिषद पंचायत समिती व जिल्हा नगरपरिषद निवडणुकीत कार्यकर्त्यांना फ्रीहँड द्यावा व दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित निवडणुका लढवण्यासाठी अनुमती द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर कल्याण पट्ट्यातील दोन माजी जिल्हा परिषद सदस्य देखील या युतीबाबत अनुकूल असल्याचे समजते.