नारायणगाव : ( प्रतिनिधी) वन विभागात वनरक्षक म्हणून काम करत असलेले रमेश खरमाळे यांच्या वृक्ष लागवडीची दखल खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात” या कार्यक्रमात घेतली असून खरमाळे यांच्या कार्याचे कौतुक सर्वत्र होत आहे. दरम्यान वन विभागाकडून सुद्धा त्यांना रजत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तसेच आजवर त्यांच्या कार्याची दखल विविध संस्थांनी घेतली असून अनेक पुरस्कर त्यांना आजवर प्राप्त झाले आहेत. तसेच शिवनेरी भूषण पुरस्कार देखील त्यांना या अगोदर प्राप्त झाला आहे.
जुन्नर तालुक्यातील धामणखेल या लहानशा गावात रमेश खरमाळे आणि त्यांच्या पत्नी स्वाती खरमाळे यांनी मिळून जे साध्य केलं, ते केवळ प्रेरणादायी नाही, तर अविश्वसनीयही आहे. रमेश खरमाळे, एक माजी सैनिक. देशासाठी तब्बल 17 वर्षं सेवा दिल्यानंतर, 2012 मध्ये आईच्या आजारपणामुळे त्यांनी लष्कराची नोकरी सोडली. पण इथंच त्यांच्या आयुष्याला नवीन वळण मिळालं.त्यांनी पर्यावरणसंवर्धनाचा वसा घेतला. आणि या प्रवासात त्यांच्या पत्नीने ठामपणे साथ दिली. सुरुवातीला एका संकल्पाने सुरू झालेली ही वाटचाल आता हजारो लिटर पाण्याचं भवितव्य ठरवत आहे. 2021 मध्ये, या दांपत्याने धामणखेल डोंगराच्या माथ्यावर 60 दिवस सतत, तब्बल 300 तास श्रमदान करत, स्वतःच्या हातांनी 70 जलसंधारण खड्डे खोदले. एकूण 412 मीटर लांबीच्या जलशोषक चरांची रचना त्यांनी उभी केली. यामुळे पावसाळ्यात करोडो लिटर पाणी जमिनीत मुरू लागलं. गावकऱ्यांसाठी हे एक वरदान ठरलं. आज या धामणखेल भागातील विहिरी वर्षभर पाण्यानं भरलेल्या असतात. पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी उचललेलं हे पाऊल आज एक सशक्त उदाहरण ठरतं आहे. शिवाय, ते आजही स्थानिक वनस्पतींचं पुनर्वनीकरण, बीजसंवर्धन, आणि पर्यावरणीय जागरूकतेचं कार्य करत आहेत. आज रमेश खरमाळे वनरक्षक म्हणून सेवा देत असले, तरी त्यांच्या मनात खऱ्या अर्थानं पर्यावरणरक्षणाची ज्वाळा आहे. वन विभागात वनरक्षक म्हणून नोकरी करत असताना बिबट्यापासून कशाप्रकारे संरक्षण करायचं याबाबतचं शेतकऱ्यांना त्यांच्या मळ्यात जाऊन मार्गदर्शन करण्याचे काम रमेश खरमाळे करीत असतात. खरमाळे यांचे काम चांगले असल्यामुळे वन खात्याने त्यांना रजत पदक द देऊन सन्मानित केले आहे. दरम्यान रमेश खरमाळे यांच्या कार्याची दखल खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्यामुळे दोन त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. दरम्यान रमेश खरमाळे म्हणाले की, गेले बारा-तेरा वर्ष मी वृक्ष लागवडीचे काम करीत आहे. माझ्या कामाची दखल थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्यामुळे मी भारावून गेलो आहे. त्यांची प्रेरणा मला मिळाल्यामुळे माझ्या कामाला आता अधिक बळ मिळाले आहे.