नारायणगाव : (प्रतिनिधी ) जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटची वेळ 1 जुलै पासून सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत करण्यात आल्याची माहिती बाजार समिती सभापती संजय काळे यांनी दिली. काळे म्हणाले की, नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्याच्या टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे व बाजार समिती आणि व्यापाऱ्यांचे नियोजन शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याने पारनेर, अकोले, संगमनेर, आंबेगाव, खेड, बीड, राहुरी या तालुक्यातील शेतकरी नारायणगावला टोमॅटो विक्रीला आणत आहेत. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी टोमॅटो मार्केटची वेळ सकाळी सात पासून करण्यात आली होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव या वेळेत बदल करण्यात आला नव्हता . परंतु आता या वेळेत शेतकऱ्यांना येण्यास अडचणीचे होत असून टोमॅटो विक्रीची वेळ बदलावी अशी बहुतांशी शेतकऱ्यांची मागणी होती. तसेच व्यापाऱ्यांनाही टोमॅटो खरेदी करायला येताना एवढ्या सकाळची वेळ थोडी घाईची होत होती. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांच्या सूचनेनुसार टोमॅटो विक्रीची वेळ एक जुलैपासून बदलण्यात आली असल्याचे काळे यांनी सांगितले. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी सुसज्ज सौचालय, स्वच्छ पाणी तसेच अल्प दरात भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. बाजार समिती संचालक मंडळ नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत असते. सध्या टोमॅटो विक्री ज्या ठिकाणी होतोय ती जागा कमी पडत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. तरकारी मार्केट तसेच संध्याकाळी धना मेथी लिलाव याच ठिकाणी होत असल्याने शेतकरी बांधवांची गैरसोय होत आहे. बाजार समितीने पुणे नाशिक महामार्गावर 13 घेतलेल्या जागेत मोठे पत्र्याचे शेड टाकून धना मेथीचा लिलाव लवकरच तिकडे हलवण्यात येणार आहे. नारायणगावचे टोमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रत सुपरिचित असल्याने या ठिकाणी दूर वरून शेतकरी टोमॅटो विक्रीला आणत असतात. या सगळ्या शेतकऱ्यांचा माल या ठिकाणी वेळेत व योग्य बाजारभाव मिळेल याबाबतची काळजी मार्केट कमिटीचे संचालक मंडळ व कर्मचारी घेत असतात. टोमॅटो खरेदीसाठी बाहेरचे देखील या ठिकाणी व्यापारी आले आहेत. बाजार समितीचे 15 हून अधिक कर्मचारी दररोज सकाळी नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये हजर राहून शेतकऱ्यांच्या टोमॅटोच्या गाड्या योग्य प्रकारे पार्किंग करण्याचे नियोजन करत असतात. तसेच एखाद्या शेतकऱ्याला काही अडचण आली तर ती अडचण तात्काळ त्याच ठिकाणी सोडवली जात असते. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या मालकीची असून शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक आम्ही करत असून शेतकरी बांधवांना काही सूचना करायची असेल तर बाजार समितीच्या कार्यालयामध्ये जाऊन लेखी स्वरूपात सूचना केल्यास त्या संदर्भात बाजार समितीचे संचालक मंडळ निश्चित सकारात्मक निर्णय घेईल असे काळे यांनी सांगितले.