नारायणगाव: ( प्रतिनिधी ) कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या वीस वर्षाच्या आमदारकीच्या काळात जुन्नर तालुका सुजलाम सुफलाम झाला. एक शिस्तप्रिय आमदार व प्रशासनावर पकड असलेला नेता अशी त्यांची ओळख आजही जनतेच्या मनात कायम आहे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे यांनी केले. माजी आमदार वल्लभ बेनके यांची 76 वी जयंती जुन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत कांदळी येथे आज (दि. 23) साजरी झाली. यावेळी माजी आमदार अतुल बेनके, जुन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष अमित बेनके, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार,माजी उपाध्यक्ष शरद लेंडे,गणपत फुलवडे,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अंकुश आमले, मोहित ढमाले, माऊली कुऱ्हाडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष तुषार थोरात, जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, भाऊ देवाडे, शिवसेनेचे नेते बाबा परदेशी, जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती बाजीराव ढोले, विघ्नहर चे माजी संचालक गुलाब नेहरकर,काळू शेळकंदे, मारुती वायाळ जुन्नर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष फिरोज पठाण, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, तानाजी बेनके आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. तसेच संस्थेच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.. यावेळी बोलताना शरद लेंडे म्हणाले की, वल्लभ बेनके यांनी कार्यकर्त्यांना खूप जीव लावला. शरद पवार यांचे ते विश्वासू सहकारी होते. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षाचे तालुका अध्यक्षपद अनेक वर्षे त्यांच्यामुळे मिळाले. एवढेच नाही तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद त्यांच्यामुळेच मिळाले . त्यांनी जुन्नर तालुक्यातील जनतेच्या हिताचे अनेक उपक्रम राबवले. चिल्हेवाडी धरणाच्या बंद पाईप लाईनचे काम त्यांच्या काळात मंजूर झाले. बेनके यांची प्रशासनावर प्रचंड पकड होती. सामान्य जनतेचे काम मार्गी लावण्यासाठी त्यांचा नेहमीच अट्टहास राहिला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे म्हणाले की, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वल्लभ बेनके यांनी मोठा आधार दिला. मला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी त्यांनी पक्ष नेतृत्वाशी संघर्ष केला. माझ्या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही.वल्लभ बेनके यांच्यासारखे नेतृत्व पुन्हा होणे नाही. यावेळी बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते बाबा परदेशी म्हणाले की, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नेहमी ताकद देण्याचे काम वल्लभ बेनके यांनी केले. जुन्नर तालुक्यातील सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांचा सतत प्रयत्न राहिला. म्हणूनच मी कट्टर शिवसैनिक असताना देखील त्यांच्या पक्षामध्ये काही काळ काम केले.दोन वेळा त्यांचा विधानसभेला पराभव झाला तरीदेखील ते न डगमगता जनतेची सेवा करीत राहिले. त्यांचा आदर्श इतरांसाठी निश्चित दिशादर्शक ठरेल. दरम्यान यावेळी जुन्नर तालुका औद्योगिक वसाहतीमध्ये उत्कृष्ट उद्योजक म्हणून काम करणाऱ्या मंगल सचिन दाते यांचा सन्मान करण्यात आला. तसेच गुणवंत कामगार म्हणून जावेद असलम शेख व विद्या संदीप ढवळे यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी तानाजी बेनके अनिल तांबे पांडुरंग पवार फिरोज पठाण काळू शेळके गणपत फुलवडे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन औद्योगिक वसाहतीचे मुख्य व्यवस्थापक तुषार पडवळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार पांडुरंग पवार यांनी मानले. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते एका व्यासपीठावर. वल्लभ बेनके यांच्या जयंतीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. शरद पवार यांच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष तुषार थोरात, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले मोहित ढमाले, जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती बाजीराव ढोले, यांच्यासह अनेक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) या पक्षाचे स्थानिक नेते वल्लभ बेनके यांच्या जयंतीनिमित्त एका व्यासपीठावर आले होते. हे सगळे नेते एकत्र आल्यामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जुन्नर तालुक्यात राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.