2019 मध्ये पेट्रोल टाकून पेटवून देणाऱ्या दोन आरोपींना अजन्म कारावास व 25 हजार रुपयांचा दंड.

WhatsApp

नारायणगाव : (प्रतिनिधी) पेट्रोल टाकून पेटवून देऊन खून केल्याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात मे 2019 मध्ये गुन्हा दाखल असलेल्या मांजरवाडी येथील दोन आरोपींना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय जुन्नर यांनी आजन्म कारावास व 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा झाली असल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. मांजरवाडी येथील रशीदभाई जाफरभाई तांबोळी (वय 55) यांना पेटवून देऊन खून केल्याप्रकरणी ऋषिकेश पोपट लोखंडे (वय 26),किरण कानिफनाथ जाधव (वय 25, दोघेही राहणार मांजरवाडी ,ता.जुन्नर, जि.पुणे) यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस.नायर यांनी शिक्षा दिली आहे.सरकारी वकील म्हणून विकास देशपांडे व गोकुळ खोडे यांनी काम पहिले.जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, फौजदार शशिकांत खरात यांनी काम पहिले. घटनेची हकीकत: मांजरवाडी येथील रशीदभाई तांबोळी यांच्या घरासमोरील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम जून 2019 मध्ये झाले होते. या रस्त्यावरून आरोपी ऋषिकेश लोखंडे याने मोटरसायकल नेल्यामुळे रस्ता खराब झाला होता. नवीन रस्ता खराब होत असल्याने या रस्त्यावरून मोटरसायकल घेऊन जाऊ नको.असा सल्ला रशीदभाई तांबोळी यांनी आरोपी ऋषिकेश लोखंडे याला दिला होता. या कारणावरून ऋषिकेश लोखंडे याने रशीदभाई तांबोळी यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली होती. झालेल्या भांडणाचा मनात राग ठेवून १५ मे २०१९ रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास ऋषिकेश लोखंडे , किरण जाधव हे रशीदभाई तांबोळी यांच्या घराजवळ आले. त्यावेळी रशीदभाई तांबोळी हे घरासमोरील ओट्यावर झोपलेले होते. यावेळी आरोपींनी त्यांना उठवून सिगारेट देण्याची मागणी केली.तांबोळी यांनी दुकान उघडून आरोपींना सिगारेट व काडीपेटी दिली.त्या नंतर ऋषीकेश लोखंडे याने आणलेल्या बाटलीतील पेट्रोल तांबोळी यांच्या अंगावर टाकले. यामुळे आरडाओरडा करून तांबोळी तेथून पळत असताना खाली पडले.दरम्यान किरण जाधव याने त्यांना पेटवले. त्यानंतर दोन्ही आरोपी तेथून पसार झाले. शेजारील नागरिकांनी तांबोळी यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.मात्र या घटनेत तांबोळी हे गंभीर भाजले होते. त्यांना उपचारासाठी नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. अत्यावस्थ झाल्याने त्या नंतर त्यांना मंचर व पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना २५ मे २०१९ रोजी रशीदभाई तांबोळी यांचे निधन झाले. या प्रकरणी शोएब रशीदभाई तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलीस ठाण्याचे तात्कालीन पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी आरोपींना अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

जाहिरात

error: Content is protected !!