कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव येथे आर्या प्रकल्पांतर्गत पाच दिवसीय फळे व भाजीपाला प्रक्रिया प्रशिक्षण संपन्न.

WhatsApp


नारायणगाव : प्रतिनिधी
      कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव येथे आर्या प्रकल्पांतर्गत ग्रामीण युवक-युवतींना फळे व भाजीपाला प्रक्रिया या विषयांतर्गत प्रशिक्षण तसेच उद्योग उभारणीसाठी मदत केली जाते. दि. १९ ते २३ मे २०२५ दरम्यान हयाच प्रकल्पांतर्गत पाच दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या उद्घाटनासाठी कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत शेटे, गृहविज्ञान विषयतज्ञ निवेदिता शेटे, देशी प्रशिक्षण समन्वयक वसंत कोल्हे हे उपस्थित होते.
या प्रशिक्षणादरम्यान उपस्थित प्रशिक्षणार्थींना फळे व भाजीपाला प्रक्रिया अंतर्गत विविध प्रकारच्या फळांपासून पल्प, ज्यूस तसेच निर्जलीकरण, प्राथमिक प्रक्रिया युनिट, रेडी टू कुक उत्पादन अशा प्रकारचे व्यवसाय करता येतील हया विषयी कृषि विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विषयतज्ञ निवेदिता शेटे यांनी माहिती दिली. प्रशिक्षणादरम्यान अन्न व्यवसायासाठी लागणारे विविध परवाने तसेच शासकीय योजना याचीही माहिती त्यांनी प्रशिक्षणार्थींना दिली.
      पुणे येथील उद्योगआशाचे संस्थापक प्रविण शिंदे यांनी उपस्थितांना जांभूळ व आंबा पल्प तसेच जांभूळ पोळी, आंबा पोळी आणि वेगवेगळे फळे आधारित पेय, जांभूळ शॉट, आंबा स्क्वॅश, सरबत, जांभूळ सरबत, मोरिंगा सूप बनविण्याचे प्रात्यक्षिक दिले. तसेच तयार पदार्थाचे पॅकेजिंग, लेबलिंग हया विषयी माहिती दिली. दुसर्‍या दिवशी वेगवेगळया भाज्या व फळांचे निर्जलीकरण व त्यानंतर त्या आधारित रेडी टू कुक पदार्थ निर्मितीचे प्रात्यक्षिकही दिले.
      हया कार्यक्रमांतर्गत अभिषेक घागरे यांनी उद्योगासाठी बाजारपेठ सर्वेक्षण, प्रमोशन, ब्रँडींग तसेच अन्नपदार्थांचे विक्री व्यवस्थापन, जाहिरात याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. सदरील प्रशिक्षणामध्ये कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम सहाय्यक धनेश पडवळ यांनी डिजिटल मार्केटिंग याविषयी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जुन्नर येथील शिवनेरी मसाले, येडगाव येथील स्वामिनी मसाले आणि कांदळी एम.आय.डी.येथील रश्मी किचन आणि परिवार हया वेगवेगळया युनिटला भेट देण्यात आली.
      या कार्यक्रमाच्या सांगता समारंभप्रसंगी प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षणाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. सदर प्रशिक्षणासाठी मोठया संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देवून करण्यात आली.

जाहिरात

error: Content is protected !!