पावसाने जुन्नर तालुक्यात शेती पिकांचे मोठे नुकसान.

WhatsApp


नारायणगाव : गेल्या आठ दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी आणि दररोज मोल मजुरी करणारे लोक मेटाकुटीला आले आहेत. “येरे येरे पावसा” या ऐवजी आता “जारे जारे पावसा” अशी विनवणी वरून राजाला होऊ लागली आहे. जुन्नर तालुक्यामध्ये बहुतांशी सर्वत्र गेल्या आठ दिवसांपासून पाऊस चालू आहे. काही ठिकाणी जोराचा पाऊस झाला तर काही ठिकाणी सोसाट्याचा वारा अधिकचा असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी तर शेतातील बांध देखील वाहून गेले आहेत. मान्सून पूर्व या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचेही मोठे नुकसान केले आहे. सध्या टोमॅटो व तरकारी या पिकांना या पावसाचा अधिकचा फटका बसत आहे. काकडी, गवार, दोडका, मुळा, मेथी कोथिंबीर. चवळी, गाजर, फ्लावर कोबी ही पिके पावसाने सडून जाऊ लागली आहेत. टोमॅटो फळाला काळे ठिपके पडू लागले आहेत त्यामुळे व्यापारी देखील काळे ठिपके पडलेले टोमॅटो घेत नाहीत. कोथिंबीर व मेथीचे प्लॉट खराब झाले आहेत. या दोन्ही पिकांच्या शेतात पाणी साठल्याने कोथिंबीर व मेथी सडून गेली आहे. दरम्यान सतत पडत असलेल्या पावसामुळे रुग्णांची संख्या देखील दवाखान्यात वाढलेली पाहायला मिळत आहे सर्दी खोकला डोकेदुखी असे रुग्ण वाढल्याचे निदर्शनात येत आहे. दूषित हवामान असल्यामुळे या पावसामध्ये कोणी भिजू नये असे आवाहन वैद्यकीय अधिकारी वर्षा गुंजाळ यांनी केले आहे. जगाचा पोशिंदा बळीराजा विविध संकटांचा नेहमीच सामना करत असतो. जुन्नर तालुक्यामध्ये येणेरे, वडज, काले,तांबे, शिंदे, राळेगण या भागामध्ये आंब्याच्या बागा आहेत. सतत आठ दिवस पडणाऱ्या पावसामुळे आंबा पिकाचे देखील नुकसान झाले आहे काही ठिकाणी सोसायटीच्या वाऱ्याने कैऱ्या खाली पडल्याने आंबा उत्पादकाना आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान या पावसाने कांदा उत्पादकांचे देखील नुकसान होताना दिसत आहे. दमट हवामानामुळे बराखतील मधील कांदा सडू लागला आहे. कांद्याला बाजार भाव नसल्याने शेतकऱ्यांना बराखीत कांदा ठेवण्याशिवाय पर्याय नाही. दरम्यान या पावसामुळे मजूरदार लोकांचे देखील मोठे हाल होताना दिसत आहे. पावसामुळे त्यांना कुठे कामाला जाता येत नाही. शेतीची खुरपणी,लागवड आदी कामे ही मजूर मंडळी करत असतात. परंतु त्यांना सुद्धा या पावसामुळे कुठे कामाला जाता येत नाही. सततच्या पावसामुळे मेंढपाळांचे देखील हाल होत आहेत. कुठेतरी माळावर वाडा ठोकून मेंढपाळांना मुक्काम करावा लागतोय. चारा देखील पावसामुळे उपलब्ध होत नाही त्यामुळे मेंढरांची देखील उपासमार होते. मेंढपाळा सोबत असलेल्या कच्च्या-बच्चांचे देखील हाल होताना दिसत आहे. पावसामुळे मेंढरांचे हाल होत आहेत. तसेच ग्रामीण भागातील शेतातून घराकडे जाणारे रस्ते देखील पूर्णपणे खराब झाले आहेत सगळीकडे चिखल झाल्याने दुचाकी वाहनावरून या रस्त्याने ये जा करणे अशक्य होऊन बसले आहे.

जाहिरात

error: Content is protected !!