नारायणगाव : वारूळवाडी (ता. जुन्नर) येथील दुय्यम निबंधक कार्यालय नारायणगाव येथील खाजगी बिल्डरच्या जागेत स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला अखेर स्थगिती देण्यात आल्याची माहिती वारुळवाडीचे सरपंच विनायक भुजबळ यांनी दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज नारायणगाव या ठिकाणी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आले असता नारायणगावचे सरपंच व इतर कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन दुय्यम निबंधक कार्यालय वारळवाडी या ठिकाणाहून हलवण्यात येऊ नये अशी मागणी केली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याशी चर्चा केली तसेच वारुवाडी या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणी आपण सुसज्ज इमारत बांधू असे सांगितले. दरम्यान ग्रामस्थांनी दुय्यम निबंधक कार्यालयाच्या स्थलांतराच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवून आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी याची गंभीर दखल घेतली. ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय हे वारूळवाडी गावातच सुरू राहील याची स्पष्ट ग्वाही दिली असल्याचे सरपंच विनायक भुजबळ यांनी सांगितले.तसेच शासनाच्या मालकीच्या जागेत नव्याने आधुनिक व सर्व सुविधा असलेली इमारत उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी समोर ठेवला असता, ग्रामस्थांनी यास तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी अजित दादा पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दुय्यम निबंधक कार्यालयासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आवश्यक आर्थिक तरतूद करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सरपंच भुजबळ यांनी सांगितले. यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर, कात्रज दूध संस्थेचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, उद्योजक संजय वारुळे, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित भाऊ खैरे, वारूळवाडीचे सरपंच विनायक भुजबळ तसेच वारूळवाडीचे उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.