नारायणगाव : (प्रतिनिधी ) ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव मध्ये इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी कु.अर्पिता हांडे विद्यामंदिरात १२ वी बोर्ड परीक्षेत ९३.००% गुण मिळवून प्रथम आली आहे तसेच डिसेंबर महिन्यात ज्ञानगंगा एज्युकेशन प्रा. लि. या संस्थेअंतर्गत घेतल्या गेलेल्या राज्यस्तरीय बोर्ड पूर्व सराव परीक्षेत महाराष्ट्रात तीने प्रथम क्रमांक मिळवला, त्यासाठी तिला एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती ज्ञानगंगा एज्युकेशन मार्फत मिळाली आहे तसेच सदर विद्यार्थीनीला ग्रामोन्नती मंडळाच्या वतीनेही दहा हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले आहे. ही बाब अभिमानास्पद व अभिनंदनीय आहे असे प्रतिपादन ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर यांनी केले. ज्ञानगंगा एज्युकेशनच्या शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यानिमित्त नारायणगाव येथील वसंत व्हीला येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ज्ञानगंगा एज्युकेशन ची सुरुवात २०२३ पासून झाली, स्वयंअध्ययनातून सर्वोत्तम शिक्षण हे ब्रीदवाक्य असलेली ज्ञानगंगा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर आत्तापर्यंत आमच्याशी जोडला गेलेला विद्यार्थी विज्ञान शाखेत 60% पेक्षा खाली आलेला नाही व आमच्या राज्यभरातील अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी केवळ स्वयंअध्ययनातून यशाच्या उंच शिखरावर पोहोचत आहे यात आम्ही समाधानी आहोत,असे मत ज्ञानगंगा एज्युकेशनचे संस्थापक श्री.अमोल आरकस यांनी मांडले.
यावेळी उपप्राचार्य हनुमंत काळे म्हणाले,
या स्पर्धात्मक परीक्षांमुळे विद्यार्थ्याला सीईटी आणि एचएससी बोर्ड अभ्यासक्रमात संतुलन राखता येत आहे व ज्ञानगंगा एज्युकेशनच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या यशात हमखास भर पडत आहे. महाराष्ट्रात प्रथम येणारी आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.अर्पिता हांडे ही विद्यामंदिरात सुद्धा प्रथम आली आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
यावेळी शिष्यवृत्ती मिळालेली अर्पिता हांडे या विद्यार्थिनीने देखील मनोगत व्यक्त केले. गुरुवर्य रा.प.सबनीस महाविद्यालयातील सर्व मार्गदर्शक शिक्षक तसेच ज्ञानगंगाच्या अन्सार मुल्ला सर व इतर सर्व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे मी हे यश मिळवले असे अप्रिता हांडे म्हणाली.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रथम येणाऱ्या दहा विद्यार्थ्यांचा सत्कार फेटे बांधून व त्यांना त्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम, एक रोप व ट्रॉफी देऊन करण्यात आला.यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिलतात्या मेहेर,विश्वस्त श्री.प्रकाश पाटे, विश्वस्त सौ.मोनिकाताई मेहेर,अध्यक्ष श्री.सुजितभाऊ खैरे, उपाध्यक्ष श्री.शशिकांत वाजगे,कार्यवाह श्री.रविंद्र पारगावकर,सहकार्यवाह श्री.अरविंद मेहेर,उपप्राचार्य श्री.हनुमंत काळे, ज्ञानगंगा एज्युकेशनचे कार्यकारी संचालक श्री.रफीक शेख, सलीम मुल्ला सर, पराग पाटील सर इतर शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक श्री.अमोल आरकस यांनी, सूत्रसंचालन श्री.रमेश शेटे यांनी तर आभार ज्ञानगंगा एज्युकेशनचे नाशिक विभाग प्रमुख श्री.तनेश लोंगाणी यांनी मानले.