ओतूर ( प्रतिनिधी ) जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांची संजीवन समाधी ओतूर ( ता. जुन्नर ) येथे आहे. संत तुकाराम महाराज वैकुंठाला जाऊन 375 वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून श्री क्षेत्र ओतूर येथे भव्य प्रमाणात त्रिशतकोत्तर वैकुंठगमन सप्ताह सोहळ्याचे आयोजन ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम ( छोटे माऊली ) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
समाधीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी
श्री क्षेत्र देहू येथून हेलिकॉप्टरने संत तुकाराम महाराजांच्या पादुका ओतूर येथे देहू संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या उपस्थितीत आणण्यात आल्या. पादुका आठ दिवस ओतूर येथे भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. यावेळी हेलिकॉप्टर मधून बाबाजी चैतन्य महाराज यांच्या समाधी मंदिरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
भव्यदिव्य नेत्रदीपक मिरवणूक
सदर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची मिरवणूक सुध्दा नेत्रदीपक लक्षवेधी आणि भव्यदिव्य आयोजित करण्यात आली होती. 375 धर्मध्वजधारी , 375 टाळकरी, 375 विणेकरी, 375 मृदुंगाचार्य, 375 कीर्तनकार, 375 कलशधारक महिला, 375 वृंदावन धारक महिला, 375 चोपदार, 375 तुकाराम नामक व्यक्ती, महिलांचे टाळपथक, भाविक,ग्रामस्थ, तसेच संपूर्ण जुन्नर तालुक्यातून अनेक नागरिक मोठ्या संख्येने मिरवणूकीत सामील झाले होते.
रिंगण सोहळा
संत तुकाराम महाराजांच्या पादुका बाबाजी चैतन्य महाराज समाधी मंदिरात नेऊन गुरू-शिष्य प्रितीसंगम भेट करण्यात आली. त्यानंतर शितोळे सरकार यांच्या आश्वांचा रिंगण सोहळा झाला. संत तुकाराम महाराजांच्या पादुका आठ दिवस ओतूर येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमाची सुरुवात अक्षय तृतीयेला धर्मध्वज अनावरण सोहळ्याने करण्यात आली. ओतूर येथील त्रिशतकोत्तर वैकुंठगमन सप्ताह सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. रविवार दिनांक 18 मे ते 25 मे दरम्यान दररोज दोन सत्रातील कीर्तनांसह, अनेक भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.