नारायणगाव : ( प्रतिनिधी ) भावी शास्त्रज्ञ निर्माण करण्यासाठी इस्रोच्या माध्यमातून देश पातळीवरील विज्ञान शाळा जुन्नर तालुक्यात उभी करण्याचा माझा प्रयत्न आहे. या कॅम्प मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अहमदाबाद येथील इस्रो केंद्राला भेट देण्याची व वैज्ञानिकांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल.आशी ग्वाही आमदार शरद सोनवणे यांनी दिली. आर्यभट्ट उपग्रहाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्ताने श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट शिवजन्मुभुमी जुन्नर यांच्या वतीनेविद्यार्थ्यांसाठी येथील गुरुवर्य रा.प.सबनीस विद्या मंदिरामध्ये 16 मे ते 21 मे 2025 दरम्यान आर्यभट्ट एक्सप्लोरर्स कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. कॅम्पचे उदघाटन आमदार शरद सोनवणे,इस्रोचे संचालक डॉ.अरविंद शालिग्राम यांच्या हस्ते झाले.या वेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर अध्यक्ष सुजित खैरे,विश्वस्त प्रकाश पाटे, प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी, इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट अध्यक्ष संतोष पिसे, सागर मिटकरी, दीपक शिवले, सचिन वाळुंज, मुख्याध्यापिका सुषमा वाळिंबे, आदी मान्यवर उपस्थित होते. इस्रोचे संचालक डॉ.अरविंद शालिग्राम म्हणाले भारतीय शास्त्रज्ञांनी अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती साधली आहे. अमेरिकेच्या सॅटॅलाइटच्या प्रक्षेपणासाठी भारत मदत करत आहे. भारताने एकाच वेळी 104 सॅटॅलाइटचे प्रक्षेपण करण्याचा विक्रम केला आहे. प्रक्षेपण केलेल्या सॅटॅलाइट पैकी 80 सॅटेलाईट अमेरिकेची होती कार्याध्यक्ष अनिल मेहेर म्हणाले विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञानाची प्राथमिक माहिती होण्यासाठी हा उपक्रम स्तुत्य आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा व कुतूहल निर्माण होईल. संतोष पिसे म्हणाले सहा दिवसाच्या या कॅम्पमध्ये उपग्रह संदर्भातील व्यावहारिक शास्त्र, अंतराळ व अभियांत्रिकी याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल. सूत्रसंचालन मेहमूद काझी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार संतोष घोटणे यांनी मानले.