नारायणगाव : (प्रतिनिधी) डिंभे डावा कालव्यात उडी मारलेल्या वारुळवाडी(ता. जुन्नर) येथील रिक्षा चालक खंडू श्रीपत संते (वय 62) या नागरिकांचा मृतदेह सुमारे पंधरा तासाच्या प्रतीक्षा नंतर आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गुंजाळवाडी येथे डिंभे डावा कालव्यात आढळून आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. खंडू संते यांनी गुरुवारी सकाळी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कालव्यात उडी मारली. कालव्यातील पाण्याला वेग असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते वाहून गेले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत नारायणगाव पोलीस, जुन्नर रेसक्यू टीमचे सदस्य यांनी कालवा परिसरात शोध घेतला. कुकडी पाटबंधारे विभागाने कालव्यातील पाणी कमी केले.मात्र त्यांचा शोध लागला नाही. आज सकाळी स्थानिक ग्रामस्थ व नारायणगाव पोलिसांनी संते यांचा पुन्हा शोध सुरू केला. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गुंजाळवाडी येथील ग्रामस्थांना डिंभे डावा कालव्याच्या पुलाखाली संते यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदानासाठी नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येने वारुळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान डिंभे डाव्या कालव्यात मागील सहा महिन्यात पाच ते सहा जणांनी आत्महत्या केली आहे.