टोमॅटोला “टॉस्पो” नव्या व्हायरसचे ग्रहण. फळे होऊ लागली रंगीबेरंगी.

WhatsApp

नारायणगाव : (प्रतिनिधी )जुन्नर तालुक्यात उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या टोमॅटो पिकावर उष्ण हवामानाचा मोठा परिणाम झाला असून फुल व फळ गळतीचा प्रमाण वाढले आहे.तसेच टोमॅटो रंगीबेरंगी होणे याचेही प्रमाण वाढले आहे. “टॉस्पो” हा नवीन व्हायरसचा विळखा वाढल्याने टोमॅटो विक्रीवर याचा परिणाम होताना दिसत आहे . दिवसेंदिवस उष्णतेचा पारा अधिकचा असल्यामुळे लागवड केलेल्या टोमॅटो पिकावर या उष्णतेचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. तसेच निसर्गाचा लहरीपणा अवेळी पडलेला पाऊस याचाही फटका या पिकाला अधिकचा बसल्याचा दिसून येत आहे. गेल्या तीन-चार वर्षापासून येडगाव परिसरामध्ये टोमॅटो पिकाला विविध प्रकारचे व्हायरस व इतर किडीने ग्रासले आहे. महागडी औषध फवारून सुद्धा व्हायरस आटोक्यात येत नाही,अशी तक्रार शेतकऱ्यांची आहे. पाडवा व अक्षय तृतीयेला लागवड केलेल्या टोमॅटोला फुले व फळधारणा कमी झाल्याचे निदर्शनात येत आहे. त्यातच यंदा डिसेंबर 2024 ते 13 मे 2025 दरम्यान टोमॅटोला योग्य बाजारभाव मिळाला नाही त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. दरम्यान टोमॅटो पिकावर उन्हाचा प्रादुर्भाव अधिकचा होऊ नये म्हणून काही शेतकऱ्यांनी या पिकाला “क्रॉप कव्हर”चा वापर केला आहे. परंतु उष्णता अधिक असल्याने या उपाय योजनेचा फारसा फायदा झाल्याचे दिसून येत नाही. टोमॅटो पिकावर मोजाक व्हायरसचा प्रादुर्भाव अधिकचा झाल्याचा दिसून येत आहे. टोमॅटोची पाने सुकणे, वाटीसारखी उलटी गोलाकार होणे, फुलगळ होणे व फुटवे न येणे असा प्रकार सध्या या पिकावर होताना दिसत आहे. त्यातच करपा व लालकोळी याचाही फटका टोमॅटोला बसला आहे. कांदा पिकावर आलेली कीड टोमॅटोवर येऊ लागली आहे. पांढऱ्या माशीचा देखील उपद्रव वाढला आहे. तिरंगा हा व्हायरस देखील अद्याप कमी झालेला नाही. प्लास्टिक व्हायरसचा व नाग अळीचा मात्र प्रादुर्भाव कमी झाल्याचे सध्या दिसून येत आहे. दरम्यान टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटो फळाचे वेगवेगळे रंग व रंगीबेरंगी दिसू लागल्याने याचा टोमॅटो विक्रीवर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. या रंगीबेरंगी टोमॅटोला व्यापारी खरेदीसाठी धजावत नसल्याचे दिसून येत आहे. ” टॉस्पो ‘ नावाचा व्हायरस वाढल्यामुळे टोमॅटो रंगीबेरंगी होत असल्याचे रोकडे येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी अजित घोलप यांना सांगितले. ते म्हणाले एकतर टोमॅटोचे बी अथवा नर्सरी मधून हा व्हायरस येण्याची शक्यता असते. दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई यामुळे टोमॅटो लागवडीला सुद्धा खर्च वाढला आहे. काही वर्षांपूर्वी टोमॅटो हे पीक हमखास पैसे मिळवून देणारे पीक म्हणून ओळखले जात होते. एकूण खर्चाच्या 30 ते 40 टक्के खर्च शेतकऱ्याचा फवारणीवर होऊ लागला आहे तर साधारणपणे 30 टक्के खर्च खतासाठी शेतकऱ्याला करावा लागत आहे. तसेच टोमॅटो लागवड करणे व तोडणीचा खर्च देखील आता वाढला आहे.टोमॅटो विक्रीला येईपर्यंत व तोडून बाजाराला आणि पर्यंत एका क्रेटला साधारण 120 ते 130 रुपये खर्च येतो. तसेच एकरी 1200 ते 1500 क्रेट टोमॅटो निघतात. किमान 300 रुपये बाजार भाव एका क्रेटला मिळाला तर टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला चार पैसे मिळण्यास मदत होऊ शकते. परंतु सध्याचा बाजारभाव पाहता टोमॅटो उत्पादक शेतकरी आतबट्ट्यात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान हिवाळ्यात लागवड केलेल्या टोमॅटोवर रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. व उत्पादन देखील चांगले निघते. पावसाळ्यामध्ये लागवड केलेले टोमॅटोचे उत्पादन कमी निघते. तसेच फेब्रुवारी व 15 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान झालेल्या लागवडीला फारसा बाजारभाव मिळत नाही. तसेच विविध रोगांचा प्रादुर्भाव या काळाचा अधिक अधिक असतो, अशा शेतकऱ्यांचा निष्कर्ष आहे. दरम्यान दिवसेंदिवस उन्हाचा पारा अधिकचा वाढत असल्याने या 40 ते 45 तापमानाचा सामना करणारी टोमॅटोची नवीन जात विकसित केली जावी अशी मागणी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगाव या ठिकाणी टोमॅटो खरेदी विक्री सुरू केल्याने व या ठिकाणी इतर मार्केट पेक्षा चांगला बाजार भाव मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे गजानन भोर यांनी सांगितले. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही तसेच शेतकरी देखील माल निवडून आणतात त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी यांचा एकमेकांवर चांगला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात

error: Content is protected !!