नारायणगाव : (प्रतिनिधी) जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील काले, तांबे, येनेरे व दातखीळेवाडी परिसरात आज ( दि. 13) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ढग फुटी सदृश्य जोरदार आवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने तातडीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी काले गावचे सरपंच कुलदीप नायकोडी यांनी केली आहे. मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस पडला. तसेच सोसाट्याचा वारा असल्याने आंब्याची फळे मोठ्या प्रमाणात पडली. तसेच वाऱ्याचा वेग अधिक असल्याने बाजरीचे पीक भुईसपाट झाले आहे. तसेच या भागात शिवनेरी हापूस आंब्याचा बागा मोठया प्रमाणात आहेत. हवेचा जास्तीचा वेग असल्याने आंब्याच्या कैऱ्यांचा सडा खाली पडला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे येणेरे,तांबे, काले या भागामध्ये शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढून शेतामध्येच झाकून ठेवला आहे. परंतु जास्त झालेल्या पावसामुळे हे सगळं पावसाचं पाणी कांद्याखाली गेल्याने कांदे पूर्ण खराब होण्याची शक्यता आहे. तसेच मुसळधार पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे शेताचे बांध देखील वाहून गेले आहेत. काही ठिकाणी घरांचे देखील नुकसान झाले आहे. शासनाच्या कृषी व महसूल विभागाने तातडीने या भागातील शेतकऱ्यांच्या पिकाचे व घरांचे नुकसानीचे पंचनामे करावेत आणि लोकांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरीवर्गाकडून करण्यात येत आहे. दरम्यान येनेरे गावचे सरपंच अमोल भुजबळ म्हणाले, आमच्या परिसरात देखील दुपारी साडेबारा-एक वाजन्याच्या सुमारास जोराचा पाऊस झाला. आमच्या भागात देखील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. जास्त पाऊस आल्याने ओढ्यांना पूर आला आहे. तसेच आंब्याच्या बागा अधिक असल्याने तोडणीला आलेले आंबे वादळाने पडले आहेत. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाले आहे. टोमॅटो व झेंडूच्या पिकात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठल्याने दोन्ही पिकाच्या पाण्याने मुळ्या सडून दोन्ही पिके वाया जाणार आहेत. त्यामुळे या पावसाचा झेंडू व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसणार आहे. अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंब्याच्या फांद्या मोडून आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दातखिळेवाडी परिसरात देखील बारा वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्याने बाजरी व टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच आंब्याच्या कैऱ्या पडल्याने येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. येणेरे काले हा परिसर शिवनेरी हापूस आंब्याचा आगर म्हणून ओळखला जातो. वादळी पावसाने येथील शेतकऱ्यांच्या आंब्याचे मोठे नुकसान केले नाही आम्हा शेतकऱ्यांना लाखो रुपयाचा आर्थिक फटका बसल्याचे काले येथील आंबा उत्पादक शेतकरी सहदेव घोगरे व रवी पानसरे यांनी सांगितले. दरम्यान या भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जुन्नरच्या निवासी तहसीलदार सारिका रासकर यांनी काले गावाला भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. “पुढारी” शी बोलताना त्या म्हणाल्या की, या भागात पाऊस जास्त झाल्याने शेताच्या पिकामध्ये पाणी साठले आहे तसेच काढलेल्या कांदा शेतात असल्यामुळे तो देखील पाण्यामुळे भिजला आहे.