विघ्नहर’ कारखान्याच्या ३९ व्या 2024-25 या गळीत हंगामाची यशस्वी सांगता.९ लाख ३ हजार ७११ मे.टन ऊसाचे गाळप पूर्ण.
नारायणगाव: पुढारी वृत्तसेवा जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने २०२४-२५ या गळीत हंगामात ९ लाख ३ हजार ७९१ मे. टन उसाचे गाळप केले असून 9 लाख ९१ हजार १०१ क्विटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. तसेच सहवीज निर्माती प्रकल्पातून ३ कोटी ५१ लाख ९२ हजार युनिट वीज निर्यात केली.तसेच कारखान्याचा विस्तारीत डिस्टीलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु असून डिस्टीलरी प्रकल्पातून ८५ लाख ३९ हजार ३८२ लिटर अल्कोहोलची व १३ लाख ९० हजार ८७६ लिटर इथेनॉल निमीती केली असल्याची माहिती अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी दिली. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ च्या ३९ व्या गाळप हंगामाची यशस्वी सांगता आज (दि.१३)झाली.यावेळी कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप, जेष्ठ संचालक संतोष खैरे, यशराज काळे, धनंजय डुंबरे, विकी काकडे, विलास हांडे, बाळासाहेब घुले, श्रीमती सुमित्रा शेरकर, योगिता शेरकर सर्व संचालक मंडळ कार्यकारी संचालक भास्कर घुले,सचिव अरुण थोरवे ऊस तोडणी कामगार, तोडणी मुकादम, ऊस वाहतूक चालक-मालक कारखान्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कारखान्याचे संचालक विकी काकडे व त्यांच्या पत्नी शुभांगी काकडे यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. यावेळी बोलताना सत्यशील शेरकर म्हणाले की, गाळप हंगाम २०२४-२०२५ मध्ये कार्यक्षेत्रात गाळपासाठी १९०५० एकर ऊस उपलब्ध झाला. सरासरी एकरी टनेज ४७.२० मे.टन मिळाले. ९ लाख ३ हजार ७११ मे.टन गाळप झाले. याकामी सर्व संचालकांनी आपआपल्या गटांमध्ये योग्य नियोजन व देखरेख करुन सर्व उसाचे गाळप होण्यासाठी सहकार्य केले. गाळप हंगाम यशस्वीरित्ता संपन्न झाल्याबद्दल कामगारांना १० दिवसांचा पगार बक्षिस म्हणून देण्यात येणारअसल्याचे यावेळी जाहिर केले. तसेच ते पुढे म्हणाले की, यावर्षी थोडे ऊसाचे गाळप कमी झाले असले तरी पुढील वर्षी सुरुवातीपासून ८००० ते ८५०० प्रती दिनी ऊसाचे गाळप करुन एकुण १३ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्रातील एकमेव विघ्नहर कारखाना कारखाना असेल की, एकाच वेळी कारखाना विस्तारणीकरण, चाचणी व गळीत हंगाम घेण्यात आलेला आहे. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करताना कार्यकारी संचालक भारकर घुले म्हणाले की, चेअरमन सत्यशिल शेरकर यांच्यासारखे कुशल व धाडसी व संयमी नेतृत्व विघ्नहर परिवारास लाभले असून धाडसी निर्णय घेवून कारखान्याचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला. विघ्नहरचा नव्याने ६५ केएलपीडी क्षमतेचा महत्वकांशी विस्तारीत इथेनॉल प्रकल्प या हंगामात पूर्ण क्षमतेने चालविला गेला असून त्यातून सुमारे ८५ लाख ३९ हजार ३८२ लिटर प्रतिदिनी क्षमतेने उत्पादन घेतले जात आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविला जात असल्याने विघ्नहरच्या यशात यामुळे मोठी भर पडत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यंदाच्या वर्षी सेवानिवृत्त झालेल्या ४७ कामगारांचा शाल, सन्मानचिन्ह आणि स्मार्टवॉच भेट म्हणून देण्यात येवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव अरुण थोरवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संचालक विवेक विठ्ठलराव काकडे यांनी मानले. @फोटो खालील ओळ- जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ३९ व्या गळीत हंगाम सांगता समारंभाप्रसंगी मार्गदर्शन करताना विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर व उपस्थित मान्यवर.( छाया- सुरेश वाणी )