नारायणगाव : ( प्रतिनिधी ) जुन्नर तालुक्यातील काले येथे वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात आज (दि. 9 ) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी दिली. दरम्यान पकडलेला बिबट्या मादी असून तिला माणिकडोह येथील निवारा केंद्रामध्ये हलवण्यात आला आहे.
काले (ता. जुन्नर )येथील संतोष नायकोडी यांच्या 10 शेळ्या बिबट्याने आठ दिवसापूर्वी ठार केल्या होत्या. यामध्ये सहा मोठे बोकड व चार शेळ्या यांचा समावेश होता. बिबट्याच्या हल्ल्यामुळे संतोष नायकोडी या गरीब शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वनविभागाने त्यावेळेस तात्काळ पंचनामा करून साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद केला आहे. संबंधित शेतकरी अत्यंत गरीब असून अवघे दहा गुंठे क्षेत्र या शेतकऱ्याला आहे. शेळी व्यवसायावरच त्याचे कुटुंब अवलंबून होते. परंतु बिबट्याने हल्ला केल्यामुळे या शेतकऱ्याचा रोजगाराच्या मार्ग बंद झाला आहे.
दरम्यान दिवसेंदिवस बिबट्याचा उपद्रव जुन्नर तालुक्यात वाढत चालला असून बिबट्या शेतकऱ्यांची पाळीव जनावरे फस्त करीत आहे. वनविभागाकडून बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी अद्याप कोणताही ठोस उपाय योजलेला दिसत नाही. केवळ माणिकडोह बिबट निवारा केंद्राची क्षमता वाढवली आहे. परंतु पकडलेले बिबटे माणिकडोह येथील निवारा केंद्रामध्ये ठेवण्यात आले असे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र हे बिबटे सोडून दिले जातात अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे बिबटे पकडून फारसा काही उपयोग होत नाही अशी खंत शेतकरी व्यक्त करतात. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी केंद्र सरकारकडे नसबंदीचा प्रस्ताव पाठवला असून 70 बिबट्यांवर नसबंदी करण्याबाबत निर्णय झाला असल्याचे बोलले जाते परंतु प्रत्यक्षात मात्र अद्याप नसबंदी संदर्भात कृती सुरू झाल्याचे दिसून येत नाही.