नारायणगाव : ( प्रतिनिधी ) दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा वरच्या पातळीवर होऊ लागल्याने गाव पातळीवर देखील कार्यकर्ते अजितदादा व पवार साहेब यांनी एकत्र यावं असाही सूर आता कार्यकर्त्यांमधून येऊ लागला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदा निवडणुका तोंडावर आल्या असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबतच्या चर्चा होऊ लागल्याने स्थानिक कार्यकर्ते खुश होऊ लागले आहेत.
कैलासनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चंद्रकांत हांडे म्हणाले की, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळाले आहे.तसेच पवार साहेब हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत. या दोघांनी या बाबतचा लवकर निर्णय घ्यावा. आपल्या भांडणाचा फायदा इतर पक्षांना होत आहे. केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारची काम चांगले चालले आहे. विकासाची काम मार्गी लावायची असतील तर सत्ता असल्याशिवाय पर्याय नाही. सत्ता नसेल तर जनतेची कामे मार्गी लागत नाही आणि मग त्याचा फटका पक्ष संघटनेवर बसतो. त्यामुळे नेत्यांनी पक्ष एकत्र येण्याबाबतचा निर्णय लवकर घ्यावा असे आम्हा कार्यकर्त्यांना वाटत असल्याचे हांडे यांनी सांगितले. जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती बाजीराव ढोले म्हणाले की, शरद पवार साहेब आमचे नेते आहेत ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. अजित दादा आणि शरद पवार यांनी एकत्र यावं ही आमची इच्छा आहेच परंतु भाजपाला पाठिंबा देऊन शेतकरी हित होणार नसेल तर ते योग्य वाटत नाही. तथापि पवार साहेबांनी जर एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर तो निर्णय आम्ही मान्य करू.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुषार थोरात म्हणाले की, जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका पुढ्यात आहेत या निवडणुकीच्या अगोदर जर याबाबतचा काही सकारात्मक निर्णय झाला तर आनंदाची गोष्ट आहे. आम्ही कार्यकर्ते पवार साहेबांना मानणारे आहोत.ते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. अजितदादा पवार यांचेही काम चांगले आहे तसेच पवार साहेबांना मानणारा गट देखील मोठा आहे. पक्ष नेतृत्वाने जर काही धोरणात्मक निर्णय घेतला तर तो आम्हा कार्यकर्त्यांना मान्य करावा लागेल असे तुषार थोरात यांनी सांगितले . राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते ऍड. विजय कुऱ्हाडे म्हणाले की, पवार साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे तसेच अजितदादा पवार यांनी वारंवार आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये जास्त आमदार निवडून आले आहेत. तसेच पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत पक्षाच्या खासदारांची संख्या जास्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्र झाली तर दिल्लीतील खासदारांना सत्तेचा फायदा होईल तसेच राज्यामध्ये सुद्धा पवार साहेबांचे जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघात सुद्धा विकास कामे मार्गे लागतील. पवार साहेब आणि अजितदादा व सुप्रियाताई सुळेआणि जयंत पाटील या वरिष्ठ नेत्यांनी याबाबतचा योग्य निर्णय घेतला तर कार्यकर्ते त्याचे निश्चित स्वागतच करतील असे त्यांनी सांगितले.