पाण्याअभावी पिकं करपली. वडज धरणाचे पाणी आम्हाला मिळणार कधी?

WhatsApp


नारायणगाव : ( प्रतिनिधी )दिवसेंदिवस उन्हाळ्याची तीव्रता अधिक वाढत चालल्याने आणि भूगर्भातील पाणी साठा कमी झाल्यामुळे विहिरी व बोअरवेल पूर्णपणे आटले आहेत. त्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. उन्हाच्या झळा अधिकच वाढल्याने रब्बी हंगामातील पिके करपू लागली आहेत. काचळवाडी व पाबळवाडी परिसरामध्ये वडज धरणातील पाणी येणार, असे गेले अनेक वर्षे या शेतकऱ्यांना सांगितले जात आहे,परंतु पाणी मात्र प्रत्यक्षात न आल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची डोळ्यादेखत होरपळ होत आहे.

जुन्नर तालुक्यात पाच धरण असली तरी सध्या धरणातील पाण्याचा साठा देखील खूपच कमी झाला आहे. त्यातच कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये पाणी न सोडण्याचा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय झाल्याने या बंदराच्या आजूबाजूच्या पिकांना पाणी कसं भरायचं अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. जुन्नर तालुका हा शेतीप्रधान तालुका असल्याने तालुक्यामध्ये विविध प्रकारची पिकं घेतली जातात. पाण्याची मुबलकता असल्यामुळे शेतकरी दरवर्षी रब्बी हंगामामध्ये तरकारी पिकाबरोबरच इतरही नगदी पिके देखील घेत असतो. यामध्ये फ्लॉवर, कोबी,वांगी टोमॅटो,उन्हाळी बाजरी,भुईमूग या पिकांकडे देखील शेतकऱ्यांचा कल असतो. परंतु सध्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने ही पिके करपू लागली आहेत. प्रामुख्याने काचळवाडी,सावरगाव, बस्ती गाढवेवाडी, निमदरी, पाबळवाडी, खिलारवाडी, निमगाव तर्फे म्हाळुंगे, धामणखेल, वडज या भागातील विहिरी आटल्याने व बोरवेलचे पाणी कमी झाल्याने शेतातील पिके करपू लागली आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेला थोड्या पावसाचा या पिकांना फारसा फायदा होणार नाही.

दरम्यान विहिरीमध्ये थोडेफार पाणी शिल्लक आहे म्हणून शेतकरी उन्हाळी भुईमुगाचे पीक घेतात व हे पीक निघेपर्यंत पाणी पुरेल अशी खात्री शेतकऱ्यांना असते परंतु यंदा उन्हाळा अधिकच कडक असल्याने आता विहिरीमध्ये पाणी आटल्याने शेतामध्ये केलेलं भुईमुगाचे पीक डोळ्यादेखत करपून चालले आहे अशी खंत काचाळवाडी येथील शेतकरी माऊली काचळे यांनी व्यक्त केली. आमच्याकडे वडज धरणातील पाणी देण्याचा निर्णय गेले अनेक वर्ष आम्ही ऐकतोय. सर्वेसाठी निधि आलाय असेही सांगितले जात आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र पाणी काय आमच्याकडे येत नाही,अशीही खंत काचळे यांनी व्यक्त केलीआहे.

जाहिरात

error: Content is protected !!