.
नारायणगाव : ( प्रतिनिधी )नारायणगाव शहर व परिसरामध्ये आज(दि.7) अचानक आलेल्या पावसामुळे दररोज भरणाऱ्या भाजीपाला व्यवसायिकांची तारांबळ उडाली. अनेकांच्या भाजीपाल्याच्या पाट्याही भिजल्या. तसेच मेंढपाळ मंडळींची देखील या पावसाने पळापळ केली. सायंकाळी सहा वाजन्याच्या सुमारास मेघ गर्जना व विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पाऊस अवघा दहा मिनिटे पडला. परंतु अचानक आलेल्या पावसामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली. सध्या विघ्नहर सहकारी साखर कारखाना सुरू असून ऊस तोडणी मजुरांना देखील या आवकाळी पावसाचा तडाखा बसला. अनेकांच्या झोपड्यांमध्ये पाणी देखील गेले. धनगर बांधवांची देखील मोठी तारांबळ उडाली. मेंढपाळ मंडळींना दररोज कोणाच्या कोणाच्या शेतामध्ये वाघुर ठोकून वाडा करावा लागतो. आज झालेल्या पावसामुळे चिखलात त्यांना मेंढरांच्या वारा ठोकावा लागणार आहे. एवढेच नाही तर या मेंढपाळांना आपल्या चिमुकल्यांसह तात्पुरत्या केलेल्या कोपीत मध्ये आपल्या कुटुंबासह मुक्काम ठोकावा लागणार आहे.
दरम्यान आज सकाळी बारा वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होते व हवेचा जोर मोठा होता. त्यानंतर मात्र आकाश पूर्ण कोरडे होते व उकडा वाढला होता. सायंकाळी झालेल्या पावसामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला होता सोसाट्याचा वारा जास्त असल्याने अनेक ठिकाणी आंब्याच्या कैऱ्या देखील पडल्या.