कुकडी प्रकल्पाच्या येडगाव धरणातून 20 मे पासून पाण्याचे आवर्तन सुटणार.

नारायणगाव: (प्रतिनिधी) कुकडी प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा अवघा 10.64% इतका शिल्लक असून कुकडी प्रकल्पाच्या येडगाव धरणातून 20 मे पासून 1400 क्यूसेक्स वेगाने जामखेड, करमाळा, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर व जुन्नर तालुक्यासाठी पाणी सोडण्यात यावे असे अहिल्यानगर येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले असल्याची सूत्रांची माहिती आहे.

हे पाणी शेतीसाठी नसून फक्त पिण्यासाठी सोडले जाणार आहे. तसेच मीना शाखा कालव्यातून बुधवारी (ता. 7) सकाळी ८ वाजल्यापासून पाणी सोडले जाणार आहे. या पाण्याचा वेग 400 क्यूसेक्स इतका असणार आहे. हे पाणी नारायणगाव शाखेपासून टाकळी हाजी पर्यंत जाणार असून 12 ते 13 दिवसाचे हे आवर्तन असल्याचे समजते. तसेच घोड शाखा कालव्याला डिंभा कालव्यातून बुधवारी (दि. 7) सकाळी,8 वाजल्यापासून पाणी सोडले जाणार आहे. या पाण्याचा उपयोग नागापूर, थोरंदाळे, रांजणी,वळती, मांजरवाडी, जवळे या गावांना होणार आहे. हे आवर्तन दहा दिवसांचे असणार आहे.

दरम्यान घोड शाखेला पाणी सोडावे म्हणून भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम व जुन्नर शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी दोन दिवसापूर्वी डिंभा कालव्याच्या पाण्यात उड्या मारून संयुक्तिक आंदोलन केले होते. तसेच या कालव्यामध्ये पाणी सोडावे याबाबतचे लेखी पत्र आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी एप्रिल 2025 महिन्यातच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले होते दिले होते. दरम्यान वडज धरणातून मीनापूरक शाखा कालव्यातही बुधवारपासून (दी. 7) सोडण्यात येणार असून हे आवर्तन 8 ते 10 दिवसांचे असणार आहे. या पाण्याचा उपयोग सावरगाव,बस्ती, वडगाव सहानी,पिंपळगाव,आर्वी, या गावातील लोकांना पिण्यासाठी होणार आहे.

दरम्यान सध्या कुकडी प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा अवघा 10.64% इतका असून येडगाव धरणामध्ये 34.96% इतका पाणीसाठा आहे तर माणिकडोह धरणामध्ये अवघा 4.43% इतका पाण्याचा साठा आहे. वडज धरणामध्ये देखील 26.58% पाण्याचा साठा आहे.पिंपळगाव जोगे धरणामध्ये मात्र 4.78% इतका अत्यल्प पाण्याचा साठा आहे. डिंभे धरणामध्ये 12.25% इतका पाण्याचा साठा आहे. दरम्यान यंदाच्या वर्षी उन्हाळा कडक असल्याने पाण्याची बाष्पीभवन देखील अधिकचे होत आहे. जनतेने पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन कुकडी प्रकल्पाच्या नारायणगाव शाखेचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी केले आहे.

जाहिरात

error: Content is protected !!