आणे पठारावरील पिके पाण्याअभावी लागली करपू.

WhatsApp


नारायणगाव: (प्रतिनिधी) जुन्नर तालुक्याच्या आणे-पेमदरा पठारावरील ओढे, नाले, तळे कोरडी पडल्याने शेतकऱ्यांची पिके करपू लागली आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने टँकर सुरू केलेत परंतु जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता भेडसावू लागला आहे. जुन्नर तालुक्याच्या आणे,नळावणे, शिंदेवाडी, वरुंडी, पेमदरा या भागामध्ये आता पिण्याच्या पाण्याचे गैरसोय निर्माण होऊ लागली आहे. नळवणे या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी पाण्याचा टँकर सुरू झाला आहे. येथे जनावरांसाठी सुद्धा पाण्याची उपलब्धता करावी लागणार आहे. सुरकुलवाडी या ठिकाणचा बंधारा देखील आता आटल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील भेडसवणार आहे. नवलेवाडी या ठिकाणी देखील पिण्याच्या पाण्याची स्थानिक नागरिकांची गैरसोय आहे. टँकर सुरू झाल्याने आता काही प्रमाणात ही गैरसोय दूर झाली आहे. आणे येथील वाड्या वस्त्यांची एकूण लोकसंख्या सुमारे 4200 इतकी असून 64 हजार लिटर सध्या पाणी या ठिकाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जात आहे. बिल्ली प्रादेशिक योजनेचे पाणी देखील वेळेवर येत नाही. त्यामुळे येथील जनतेची पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. या भागात टँकरच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी सरपंच प्रियांका दाते यांनी केली आहे. शिंदेवाडी या ठिकाणी देखील शासनाने टँकर सुरू केला परंतु या टँकरच्या फेऱ्या आधीच्या वाढविल्या जाव्यात अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. व्हरुंडी या ठिकाणी देखील पिण्याच्या पाण्याची वाणवा निर्माण होऊ लागली असून विहिरी आटल्याने व भूगर्भातील पाणीसाठा कमी झाल्याने बोरवेल देखील आटल्या आहेत. त्यामुळे या भागातील पिके करपू लागली आहेत. या भागात सध्या काही ठिकाणी टोमॅटो आणि वाटाणा ही पिके घेतली जातात परंतु सध्या पाणी नसल्यामुळे टोमॅटोची पिके देखील करपू लागले आहे. या भागात काही ठिकाणी उसाची पिकं असून पाण्याअभावी ती सुद्धा जळाली आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी उसाची विक्री सुरू केली आहे. पेमदरा येथील चोळीच्या बांधायचे पाणी कमी झाल्याने शेतीला पाण्याचा पुरवठा कमी प्रमाणात करावा लागत आहे. तीन दिवसानंतर शेतकऱ्यांना या ठिकाणाहून पाणी उचलावे लागत आहे. पूर्ण मे महिना व जून महिना शेतकऱ्यांसाठी मोठा अडचणीचा जाणार आहे. दरम्यान हिवरे तर्फे नारायणगाव, सातपुडा या भागात देखील पिके पाण्या अभावी जळाली आहेत. मीना कालव्याला तात्काळ पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांची होऊ लागली आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय झाल्यावर पाणी सोडले जाईल असे संबंधित अधिकारी शेतकऱ्यांना सांगत आहेत. परंतु कोवळ्या पिकांना पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे अधीकचे नुकसान होत आहे.

जाहिरात

error: Content is protected !!