दौंड ( प्रतिनिधी ) दौंड तालुक्यातील दहिटणे येथील बापूजी बुवा वस्ती परिसरातील मेंढपाळ भिसे यांच्या वाड्यावरून एका अकरा महिने वयाच्या मुलाला बुधवारी (दि. 30) रोजी पहाटे पाचच्या सुमारास बिबट्याने झडप घालून आईच्या कुशीतून उचलून नेले असल्याची धक्कादायक घटना घडली. आईने आरडाओरडाकरेपर्यंत बिबट्याने धूम ठोकली होती. अनिकेत धुळा भिसे( वय 11) महिने असे या बालकाचे नाव आहे.
स्थानिक नागरिकांनी शोधा शोध केल्यानंतरही बिबट्या आढळून आला नाही या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थ मोठे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.वनविभाग व यवत पोलीस यांनी स्थानिकांच्या मदतीने परिसरामध्ये बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. बुधवारी संध्याकाळपर्यंत संबंधित चिमुकल्याचा ठाव ठिकाणावर लागला नाही.
दरम्यान दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. अनेकदा बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्लेही केले आहेत. या परिसरामध्ये पिंजरा लावण्याची मागणी अनेकदा करूनही वन विभागाने हलगर्जीपणा दाखवला असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांची आहे. शासनाने बिबट्यांना गोळ्या घालण्याची अनुमती द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.