नारायणगाव : ( प्रतिनिधी) सन 2025- 26 मध्ये गाळपास येणाऱ्या उसाला रास्त आणि किफायतशीर भाव (FRP ) प्रतिक्विंटल 355 रुपये म्हणजेच प्रति टन 3550 रुपये मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.
गळीत हंगाम 2024-25 मध्ये गाळपास आलेल्या उसास 3400 रुपये एफआरपी होती त्यात आता 150 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून कमीत कमी 3500 रुपये मे. टन या भावाने उसाची खरेदी करावी लागणार आहे. या निर्णयाचा फायदा पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
2025- 26 मध्ये गळीत हंगामासाठी 10.25% रिकव्हरी साठी 355 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळणार आहे. उसाच्या उताऱ्यात 0.1% वाढ असेल तर शेतकऱ्यांना 3.46 अधिक मिळतील आणि उताऱ्यात 0.1% घट झाली तर 3.46 कपात केली जाणार आहे.
उसाचा उत्पादन खर्च आणि त्यावर 15% नफा गृहीत धरून एफआरपी ठरवली जाते केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोग दराची शिफारस करते. त्यानंतर केंद्र सरकार त्याला मंजुरी देते. एफआरपी ठरवल्यानंतर तेवढी किंमत साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना देणे कायदेशीर बंधनकारक आहे. अन्यथा कारखान्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करता येतो.
दरम्यान पुढील वर्षी गाळपास येणाऱ्या उसाला 3550 रुपये एफआरपी मिळणार असली तरी उसाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात होत असतो त्यामुळे एवढा बाजार भाव मिळून सुद्धा शेतकऱ्यांचा त्यामध्ये काहीच फायदा होत नाही केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने याबाबतचा फेरविचार करून उसाला प्रति टन 4500 रुपये इतका बाजारभाव द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हांडे यांनी केली आहे.